रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी एकवटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:16 PM2020-10-27T13:16:55+5:302020-10-27T13:17:06+5:30
दोन दिवसात गटनेत्यांची बैठक बोलावून सामुहिक आंदोलनाची तयारी केली जाणार आहे.
वाशिम : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह (सीईओ) १२ विभाग प्रमुखांच्या रिक्त पदासंदर्भात पालकमंत्री शंभुराज देसाई आणि राज्याच्या मुख्य सचिवांमध्ये बैठक होऊनही तोडगा निघाला नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी एकवटले असून, त्याअनुषंगाने येत्या दोन दिवसात गटनेत्यांची बैठक बोलावून सामुहिक आंदोलनाची तयारी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत, वित्त व लेखा, सामान्य प्रशासन, बांधकाम, लघु सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, समाजकल्याण, रोजगार हमी योजना आदी विभागाला प्रमुख नाहीत तसेच पाच पंचायत समित्यांना गटविकास अधिकारी नाही. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य सुधीर कव्हर यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समिती सभेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. यावर सामुहिक धरणे किंवा उपोषण आंदोलन हे सर्व सदस्य व पदाधिकारी करतील,असे ठरले होते. २५ दिवसाच्या कालावधीनंतरही सीईओ व विभाग प्रमुखांची रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या दोन दिवसात सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी स्पष्ट केले. सीईओंसह विभाग प्रमुखांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी सर्व सदस्य आणि पदाधिकारी हे आंदोलनाच्या निर्णयाप्रत येणे ही बाब अमरावती विभागातील जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असल्याचे बोलले जात आहे.