मंगरूळपीर तालुक्यावर घोंगावतेय पाणीटंचाईचे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:38 PM2019-04-12T13:38:08+5:302019-04-12T13:38:15+5:30
मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर असून विहिरी, हातपंप आणि कुपनलिका या जलस्त्रोतांची पातळीही खालावत चालल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगरूळपीर तालुक्यावर भीषण पाणीटंचाई संकट घोंगावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर असून विहिरी, हातपंप आणि कुपनलिका या जलस्त्रोतांची पातळीही खालावत चालल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगरूळपीर तालुक्यावर भीषण पाणीटंचाई संकट घोंगावत आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून अतीटंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
मंगरूळपीर तालुक्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के पाऊस झाला. यामुळे नदी-नाले, तलाव तुडूंब होण्यासोबतच जलस्त्रोतांची पातळीही कमालीची वाढली होती. मात्र, जमिनीत पाणी मुरण्यास अडथळा ठरणाºया ‘बेसॉल्ट’ खडकाचे तुलनेने तालुक्यातील गावांमध्ये असलेले अधिक प्रमाण, योग्य नियोजनाचा अभाव आणि पाणी बचतीबाबत असलेल्या उदासिनतेमुळे यावर्षी पुन्हा मार्च महिन्यानंतरच अधिकांश तलाव कोरडे पडले असून अन्य जलस्त्रोतांच्या पातळीवरही परिणाम झाल्याने मंगरूळपीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
काही गावांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत पाणी पुरवठा सुरू केल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे; परंतु बºयाच गावात हा उपक्रम राबविण्यासाठी पुरेशे पाणी उपलब्ध नाही. दरम्यान, सद्या सुरू असलेल्या एप्रिल महिन्यात पाणीटंचाई अधिक गंभीर स्वरूप धारण करणार नसली तरी आगामी मे आणि त्यानंतर जून महिन्यात ही समस्या बळावणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याकडे लक्ष पुरवून प्रशासनाने पाणीटंचाईच्या संभाव्य कृती आराखड्यात केलेल्या नियोजनानुसार ठराविक विहिरींचे अधिग्रहण करून तथा अतीटंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यासोबतच अन्य स्वरूपातील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.