गावकरी नळ योजनेच्या पाण्यावर अवलंबून
आठ दिवसांनी पाणी येत असल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी दैना
काजळेश्वर उपाध्ये : काजळेश्वरातील पाणीप्रश्न ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तापत आहे. गावकऱ्यांना किमान तिसऱ्या दिवशी तरी पाणी मिळावे याबाबत स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी येथील प्रहार जनशक्ती शक्ती संघटनेने केली आहे.
काजळेश्वर गावाला पाणीपुरवठा नळ योजनेद्वारा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन करते. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणी पातळी कमालीची घटली, त्यामुळे गावातील हातपंप, विहिरी आटल्यात. अनेकांच्या घरगुती विंधन विहिरीची पाणी पातळी खोल गेल्याने पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे गावकऱ्यांना सार्वजनिक नळ योजनेशिवाय पर्याय उरला नाही. सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचाही पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे गावकऱ्यांना आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळत आहे. करिता स्थानिक प्रशासनाने पाणीप्रश्नी संवेदनशील राहून गावकऱ्यांना किमान तिसऱ्या दिवशी तरी पाणी द्यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेच्या सेवकांनी स्थानिक प्रशासनास केली आहे.