लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया साळंबी येथे कुठलीही पाणी पुरवठा योजना किंवा शासकीय जलस्त्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. गावालगतच्या, तसेच शेतशिवारातील विहिरींचा आधार घेऊन येथील ग्रामस्थ आपली तहान भागवित आहेत.मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया साळंबी गावाची लोकसंख्या ७०० पेक्षा अधिक आहे. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतमजुरी असून, प्रामुख्याने बंजारा समाजातील लोकांची या ठिकाणी वस्ती आहे. या ठिकाणी ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्वी सावरगाव येथून शासकीय योजना राबविण्यात येत होती; परंतु जवळपास १५ वर्षांपूर्वी ती योजनाही बंद पडली. त्यातच गावात हातपंप किंवा सार्वजनिक विहिरीसारखे कोणतेही जलस्त्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना गावालगत असलेल्या किंवा शेतशिवारातील खाजगी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. तहान भागविण्यासाठी महिला मंडळी डोक्यावर हंडा घेऊन किलोमीटर पायपीट करतानाचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गावालगत लहानमोठे जलाशय किंवा तलाव असतानाही येथे शासकीय पाणी पुरवठा योजना सुरू करण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही किंवा लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा झाला नाही.
गावात कोणतीही शासकीय पाणी पुरवठा योजना नाही किंवा हातपंपही नाही. त्यामुळे आम्हाला गावालगत असलेल्या किंवा शेतातील खाजगी विहिरीवरून पाणी आणून गरजा भागवाव्या लागत आहेत. येथे पाणी पुरवठा योजना सुरू करावी, अशी आमची मागणी आहे.-संजय सातपुते, ग्रामस्थ साळंबी