निवेदनात इढोळे यांनी नमूद केले आहे की, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या ग्राम अडोळी येथील पाझर तलावातील पाण्याचा अनेक कास्तकार अवैधरित्या उपसा करत आहेत. या अवैध पाणी उपशामुळे पाझर तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सद्यस्थितीत तलावात २५ टक्के एवढाच जलसाठा उपलब्ध आहे. या पाझर तलावाच्या जवळच गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर व पाणीपुरवठा योजना आहे. या पाझर तलावातून शेतीसह गुराढोरांना पाणी देणे गरजेचे आहे. मात्र, काही कास्तकारांकडून प्रचंड प्रमाणात होत असलेल्या अवैध पाणी उपशामुळे गावावर पाणीटंचाईचे संकट गहिरे झाले आहे. या प्रकाराला त्वरित आवर न घातल्यास उन्हाळ्याच्या तोंडावर भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा प्रकार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने २७ फेब्रुवारी रोजी रितसर ठराव घेऊन २ मार्च रोजी लघुसिंचन विभागाकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र, अवैधरित्या पाणीउपसा करणाऱ्यांवर लघुसिंचन विभागाकडून अजून कोणतीच कारवाई होत नसल्याने या प्रकाराची संबंधीत विभाग पाठराखण तर करत नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे हा प्रकार रोखून अवैधरित्या पाणीउपसा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा येत्या ५ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा इढोळे यांनी लघुसिंचन विभागाला दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.
पाझर तलावातील अवैध पाणी उपशामुळे अडोळी गावावर पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:41 AM