कोरोनावर मात करणाऱ्या ६४ जणांच्या वजनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:41 AM2021-01-25T04:41:14+5:302021-01-25T04:41:14+5:30
वाशिम : कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहार, आराम आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने काही जणांचे वजन वाढत ...
वाशिम : कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहार, आराम आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने काही जणांचे वजन वाढत असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत जवळपास ६४ जणांचे वजन वाढल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येतात. कोरोनावर मात केल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहारावर भर दिला जातो तसेच काही जण आराम करीत असल्याने आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने जिल्ह्यातील जवळपास ६४ जणांचे दोन ते पाच किलोदरम्यान वजन वाढल्याचे दिसून येते.
०००
एकूण कोरोना रुग्ण ७०१२
बरे झालेले ६७०७
वजन वाढल्याच्या तक्रारी ६४
००
कोरोनावर मात केल्यानंतर नियमित व्यायामावर भर द्यावा. वजन वाढेल, असा आहार टाळावा. शरीराची हालचाल होईल, असा व्यायाम करावा. कोरोनावर मात केल्यानंतर वजन वाढत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
०००
औषधांचा डोस
उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड दिले जाते. त्यामुळेही वजन वाढते; शिवाय आराम आणि शून्य व्यायाम याचाही परिणाम वजन वाढीवर होतो. आतापर्यंत कोरोनावर ६७०७ जणांनी मात केली आहे. त्यापैकी केवळ ६४ जणांचे वजन वाढल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे उर्वरित सर्वांचे वजन स्थिर असल्याचे दिसून येते.
०००
आधी ६७; नंतर ७० किलो झाले वजन
कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी ६७ किलो वजन होते; कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहारावर भर दिला. उपचारादरम्यान औषधी घेतली. मात्र, नियमित व्यायाम न केल्याने वजन वाढले आहे. जवळपास तीन किलो वजन वाढल्याचे कोरोनावर मात केलेल्या एका जणाने सांगितले.
कोरोनावर मात केल्यानंतर कोणता आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम कसा करावा, याबाबत डाॅक्टरांनी सल्ला दिला होता. सुरुवातीच्या काही दिवस डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार दिनचर्या ठेवली. मात्र, त्यानंतर दिनचर्येत बदल झाला. त्यामुळेही वजनात वाढू होऊ शकते.
वजनात किंचितशी वाढ झाली असली तरी त्रास मात्र कोणताही नाही. वजन कमी करण्यासाठी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम आणि आहारावर भर देण्यात येत आहे, असेही कोरोनावर मात केलेल्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत ७०१२ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. यापैकी ६७०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर वजन वाढण्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्यच म्हणावे लागेल. योग्य आहार, व्यायामावर भर देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.