वाशिम : कोरोनामुळे यंदाही नववीतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नववीत उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी त्याच शाळेत दहाव्या वर्गात प्रवेश घेतात. परंतु काही विद्यार्थी बाहेरील जिल्ह्यात, तर परजिल्ह्यातील काही विद्यार्थी वाशिम जिल्ह्यात प्रवेश घेण्याची शक्यता असल्याने २६ जूननंतरच दहावीत नेमके किती प्रवेश झाले, याचा आकडा निश्चित होणार आहे. तुर्तास नववीत उत्तीर्ण झालेले २० हजार विद्यार्थी दहावीसाठी कुठे प्रवेश घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून शिक्षण विभागाला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे अनलॉकमध्येही शाळा लॉक राहणार की अनलॉक होणार, याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत जवळपास १,३६४ शाळा आहेत. गतवर्षी जिल्ह्यात नववीच्या वर्गात २० हजार ३२० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. यंदा नववीची परीक्षा रद्द झाल्याने हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्गात प्रवेश निश्चित होणार आहेत. मात्र, यामधील काही विद्यार्थी हे परजिल्ह्यात शिक्षणासाठी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच परजिल्ह्यातील काही विद्यार्थी वाशिम जिल्ह्यात शिक्षणासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. २६ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार असल्याने त्यानंतरच दहावीच्या वर्गात नेमके किती प्रवेश झाले, याचा आकडा निश्चित होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
०००००
जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी २०,३२०
दहावीत प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी- --
00000
२६ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया (बॉक्स)
नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. बहुतांश विद्यार्थी हे त्याच शाळेत पुढच्या वर्गासाठी प्रवेश घेतात. परंतु, नोकरीवर असलेल्या काही पालकांची बदली झाली तर ते आपल्या पाल्याचे प्रवेश काढून बदलीच्या ठिकाणी शाळेत प्रवेश घेतात.
अनलॉकच्या टप्प्यात ७ जूनपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे आता कुठे प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्ह्यातील शाळा २६ जून रोजी प्रशासकीय कामासाठी उघडणार आहेत. तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.
२६ जूननंतर दहावीत नेमक्या किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, किती विद्यार्थी परजिल्ह्यात शिक्षणासाठी गेले, किती विद्यार्थ्यांचे प्रवेशच झाले नाहीत, याचा आकडा निश्चित होणार आहे.
००००
स्थलांतरणामुळे प्रवेश कमी होण्याची भीती
स्थलांतरण, आर्थिक चणचण आदी कारणांमुळे यंदा प्रवेश कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे परजिल्ह्यातून काही विद्यार्थी शिक्षणासाठी वाशिम जिल्ह्यात आले तर प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा वाढूही शकतो. कोरोनामुळे परजिल्ह्यातील कामगार, मजूर हे स्वजिल्ह्यात परतण्याची शक्यता असल्याने त्यांच्या पाल्याचे प्रवेश अन्यत्र होऊ शकतात.
०००००
२६ जूननंतर आकडा निश्चित होईल
कोट
शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात नववीच्या वर्गात २०,३२० विद्यार्थी होते. यंदा कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने नववीतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी जिल्ह्यातील शाळेत दहावीत प्रवेश घेतीलच, हे तुर्तास तरी निश्चित सांगता येणार आहे. २६ जूनला प्रशासकीय कामासाठी शाळा उघडल्यानंतर दहावीतील प्रवेशित विद्यार्थ्यांचा निश्चित आकडा कळू शकेल.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम