अनलॉकमध्येही वाशिम जिल्ह्यातील शाळा राहणार ‘लॉक’ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:35 PM2021-06-13T12:35:56+5:302021-06-13T12:36:02+5:30
Educaiton Sector News : अनलॉकमध्येही शाळा लॉक राहणार की अनलॉक होणार याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून शिक्षण विभागाला कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे अनलॉकमध्येही शाळा लॉक राहणार की अनलॉक होणार याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षादेखील रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावी व बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने शाळा सुरू होणार? की नाही, याकडे पालकांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत जवळपास १३६४ शाळा आहेत. ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा ग्रामपंचायतींनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरू करावयाच्या झाल्यास शाळांचे निर्जंतुकीकरण, साफसफाई व अन्य कामे आतापासूनच करावी लागणार आहेत. विदर्भात शाळेची पहिली घंटा २६ जून रोजी वाजते. शाळा सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून अद्याप शिक्षण विभागाला सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे शाळा केव्हा सुरू होणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांचे लक्ष लागून आहे.
शाळा सुरू करायची म्हटली तर...
मे महिन्यात ग्रामीण भागात अधिक संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा ताब्यात घेण्यात आल्या. २६ जूनपासून शाळा सुरू करावयाचे आदेश आल्यास, शाळांचे निर्जंतुकीकरण, साफसफाईसाठी किमान आठ दिवसाचा कालावधी लागू शकतो. शाळेची डागडूजी, निर्जंतुकीकरण, साफसफाई व अन्य सुविधा यासाठी १० ते २० हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. यासाठी निधी कोण पुरविणार? हा प्रश्न अनुत्तरीय आहे.
गुरूजींची शाळा सुरू होणार
nगतवर्षीदेखील विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असल्या तरी प्रशासकीय कामासाठी शाळा सुरू होत्या. यंदादेखील २६ जूनपासून वरिष्ठांच्या सुचनेनुसार कोरोना लसीकरण, शिक्षण विभागाचे प्रशासकीय कामकाज व अन्य कामकाजासाठी शिक्षकांना शाळेत बोलाविण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विदर्भातील शाळा दरवर्षी २६ जूनपासून उघडण्यात येतात. गतवर्षीदेखील कोरोनामुळे २६ जूनपासून शाळा सुरू झाल्या नव्हत्या. शाळा सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून अद्याप सूचना प्राप्त झाल्या नाहीत. प्रशासकीय कामासाठी शिक्षकांना बोलाविले जाऊ शकते. वरिष्ठांच्या सुचनेनुसार शाळांसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- गजानन डाबेराव,
उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम.