महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:51 PM2019-10-12T18:51:33+5:302019-10-12T18:51:38+5:30
महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे घणाघाती प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत शनिवारी केले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करणाºया गद्दारांना टकमोक टोकावरून ढकलून दिले जायचे. तशीच काहीशी परिस्थिती सद्या निर्माण झाली असून जनतेचे मत म्हणजेच टकमक टोक असून त्याची प्रचिती गद्दारांना यंदाच्या निवडणूक नक्की येणार आहे. महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे घणाघाती प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत शनिवारी केले. यायोगे त्यांनी अप्रत्यक्षपणे सेनेवर निशाना साधला.
भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर वाशिम, कारंजा येथील भाजपाच्या आमदारांसह महायुतीमधील पदाधिकाºयांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीमधील घटक पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे आता विधानसभेत त्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोबत राहावे. महायुतीत जी जागा ज्या पक्षाला सुटली, त्याच पक्षाच्या चिन्हाखाली सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. असे होत नसेल तर संबंधितांची भविष्यात गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी बंडखोर व त्यांना मदत करणाºयांना दिला. आमदार राजेंद्र पाटणी यांनी याप्रसंगी भाजपाने जिल्ह्यातील विकासकामांसाठी दिलेला निधी व त्यातून झालेल्या कामांबाबत मनोगत व्यक्त केले.
काँग्रेस-रा.काँ.ने जाहीरनाम्या वाटली आश्वासनांची खैरात!
यंदाच्या विधानसभा निवडणूकीत यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नसणाºया काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्व प्रकारच्या आश्वासनांची अक्षरश: खैरात वाटली. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला ताजमहाल बांधून देऊ आणि प्रत्येकास चंद्रावर किमान एक फ्लॅट देऊ, अशी केवळ दोन आश्वासने त्यात नाहीत, अशी मिश्कील टिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.