लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७१६.४२ कोटी रुपये खर्चून पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ‘बॅरेजेस’ची कामे पूर्ण होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला; मात्र विद्यूत उपकेंद्रांची कामे संथगतीने सुरू होती. आता तर ‘लॉकडाऊन’मुळे मजूर परगावी परतल्याने ही कामे जवळपास दोन महिन्यांपासून ठप्प आहेत. परिणामी, पावसाळ्यानंतर पाणीसाठा होऊनही नदीतील पाणी वापरणे शक्य होणार नसल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न उद्भवणार असल्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष कमी करण्यासाठी शासनाने पैनगंगा नदीवर ७१६.४२ कोटींचा निधी खर्चून बॅरेजेस उभारले. यासह बॅरेजेस परिसरात विद्यूत सुविधांचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ११ विद्यूत उपकेंद्र उभारण्याच्या कामास हिरवी झेंडी दिली. पहिल्या टप्प्यात २५ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात १३ कोटींचा निधी प्राप्त झाला. दरम्यान, डिसेंबर २०१९ अखेर नारेगाव, अनई आणि धामणी खडी येथील विद्यूत उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली. वनविभागाने उपस्थित केलेल्या जागेच्या वादामुळे एक उपकेंद्र रद्द करण्यात आले; तर उर्वरित उपकेंद्रांची कामे विविध स्वरूपातील अडचणींमुळे संथगतीने सुरू होती.तथापिख पावसाळ्यापुर्वी सर्व विद्यूत उपकेंद्रांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असतानाच कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात कामावरील मजूर आपापल्या गावी परतल्याने कामांना पुन्हा ‘ब्रेक’ लागला असून कामे लांबणीवर पडली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. वाशिम जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेस परिसरात विद्यूत सुविधांचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी ११ विद्यूत उपकेंद्र उभारण्यात येत आहेत. त्यापैकी चार उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली असून पावसाळ्यापुर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते; मात्र ‘लॉकडाऊन’मुळे मजूर उपलब्ध नसल्यानेच कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.- व्ही.बी. बेथारियाअधीक्षक अभियंता, महावितरण
पैनगंगा नदीच्या बॅरेजेस परिसरातील विद्युत उपकेंद्रांची कामे ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 11:38 AM