काेराेना संसर्गामुळे अचानक लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांची तारांबळ उडाली. गाेरगरीब जनतेला तर आता जीवन कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला हाेता. परंतु जिल्हयातील लाेकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन माेलाचे कार्य केले. यामध्ये वाशिम, कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, रिसाेड, मानाेरा परिसरातील संघटना, व्यक्तींचा समावेश आहे. अनेकांनी खादय पदार्थ, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. काहींनी काेराेना संसर्ग पाहता मास्क, साबण, सॅनिटायझर, हॅन्डग्लाेजचे वाटप केले. संकटप्रसंगी सामाजिक कार्य करणाऱ्यांचे माेलाचे याेगदान लाभलेले दिसून आले.
...............................
मुक्या जनावरांसाठी धडपड
लाॅकडाऊन काळामध्ये अनेकांनी गाेरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे केला असला, तरी सर्वत्र शुकशुकाट असताना मुक्या जनावरांसाठी वाशिम येथे राजाभैय्या पवार मित्रमंडळाने चारा, पाणी, अन्नाची व्यवस्था केली हाेती.
........................
लाेकप्रतिनिधींचाही पुढाकार
जिल्हयात लाॅकडाऊन काळात अनेक गाेरगरीब, हातमजुरीवर कुटुंब चालविणाऱ्यांसाठी मदतीचा हात म्हणून जिल्हयातील लाेकप्रतिनिधींनीही माेलाचे कार्य केले आहे. आपआपल्या मतदारसंघांमध्ये अन्नधान्य वाटपासह आवश्यक वस्तू घरपाेच पुरविल्यात. यामध्ये खासदार भावना गवळी, आ. राजेंद्र पाटणी, आ. अमित झनक, आ. लखन मलिक यांच्यासह इतर लाेकप्रतिनिधींचा समावेश आहे.
.........................
काेराेना याेध्द्यांसाठी अन्नदान करणारा राजा
जिल्हयात लाॅकडाऊन सुरू असताना सर्वत्र कडकडीत बंद. या काळात कर्तव्यावर असलेले पाेलीस अधिकारी, कर्मचारी, आराेग्य विभागातील कर्मचारी, शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांना संपूर्ण लाॅकडाऊन काळात अन्न, पाणी पुरवठा समाजसेवक राजू पाटील राजे यांच्याकडून करण्यात आला.