ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील कामे संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 05:27 PM2019-07-16T17:27:54+5:302019-07-16T17:28:03+5:30
संबंधित सर्वच गावांमध्ये या अभियानांतर्गत कामांची गती मंदावली असून अपेक्षित विकास साध्य झाला नसल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात जिल्ह्यातील सात गावांचा समावेश आहे; मात्र संबंधित सर्वच गावांमध्ये या अभियानांतर्गत कामांची गती मंदावली असून अपेक्षित विकास साध्य झाला नसल्याचे दिसून येत आहे.
दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, स्वच्छता, कृषी उत्पादनात वाढ करणे, स्वच्छ पाणी, गावात इंटरनेट जोडणी देणे, गावातील सर्वांसाठी पक्की घरे, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, गावातील युवकांना कौशल्यपूर्ण बनवून रोजगाराच्या संधी मिळवून देणे आदी उद्देश समोर ठेवून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची आखणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, कारंजा तालुक्यातील वाई, शेवती, वढवी, मांडवा, किनखेडा, लोहारा आणि किसननगर या सात गावांमधील कुटुंबांची संख्या, दरडोई उत्पन्न, शिक्षणाचे प्रमाण, दिव्यांगांची संख्या, गावातील सोई-सुविधा, कृषी, सिंचन क्षेत्रांमधील सुविधा, शाळा, आरोग्य सुविधा आदिंचे सर्वेक्षण करून त्याआधारे ग्रामस्थांच्या मदतीने गाव विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार, संबंधित गावांमध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून गावातील प्रत्येक शेतकरी या गट अथवा कंपनीसोबत जोडला जाईल, यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित होते. या गावांमधील ज्या शेतकºयांनी ‘पोकरा’अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज सादर केले आहेत, त्या अर्जांवर तातडीने निर्णय व्हायला हवा होता. सातही गावांमधील पात्र शेतकºयांना पिक कर्जाचा लाभ देण्यासाठी व त्यांचा पिक विमा हप्ता भरून घेण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन होणे गरजेचे होते.
प्रत्यक्षात मात्र या सर्व कामांकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. परिणामी, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात सहभागी गावांचा विकास होण्याऐवजी मागासलेपण अद्यापही दुर झाले नसल्याचे बोलले जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
ग्राम सामाजिक परिवर्तनचा मूळ उद्देश
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून शेतमालाचे उत्पन्न दुप्पटीने वाढविणे, पिकांच्या प्रति हेक्टरी उत्पादनात सुधारणा करणे, मागास कुटुंबांना दारिद्रयरेषेवर आणणे, युवकांना कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करणे, सर्व गावांमध्ये डिजिटल संपर्क यंत्रणा स्थापित करणे, सर्व कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे, गावांमध्ये शुध्द आणि सुरक्षित पाणी पुरवठा करणे, बालमृत्यू दरात घट करणे, सर्व गावांमध्ये आरोग्यविषयक व स्वच्छता दर्जा सुधारणे, आदी उद्देश बाळगण्यात आले आहेत.
वाडी रामराव, कवरदरी, पिंपळशेंडा या गावांमधील विकासकामांना प्रशासनाची मंजूरी
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात मालेगाव तालुक्यातील वाडी रामराव, कवरदरी आणि पिंपळशेडा या गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या तीनही गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान निधीतून प्रस्तावित करावयाच्या विकासकामांना प्रशासनाकडून मंजूरी देण्यात आली. त्यानुसार, कामे सुरू करून निर्धारित मुदतीपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.