शिखरचंद बागरेचा / लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यासह संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे हजारो लोक बळी पडत आहेत. या महामारीला रोखण्यासाठी शासनाने काही सवलती वगळता कडक निर्बंध लावले आहेत. असे असताना मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार गावात थेट पोलीस चौकीच्या मागेच दररोज ताजी वरली व्यवसाय माेठ्या प्रमाणात सुरू असल्याचा प्रकार ‘लाेकमत’ने बुधवारी उघडकीस आणला. विशेष म्हणजे येथे वरलीचा व्यावसायिक व येणारे ग्राहक काेराेना नियमांचे काेणतेच पालन करताना दिसून आले नाही.
जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून गणल्या जाणाऱ्या शेलू बाजार गावातील मुख्य चौकात वाहतूक पोलीस चौकीच्या मागे फक्त ५० ते ६० फूट अंतरावरील परिसरात हा ताजी वरलीचा गाेरखधंदा सुरू आहे. यासंदर्भात प्राप्त माहितीवरून ‘लाेकमत’तर्फे करण्यात आलेल्या पाहणीत गंभीर प्रकार समाेर आले. काेराेना संसर्ग असताना काेणतेच नियमाचे पालन हाेताना दिसून आले नाही. सकाळी ७ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत हा व्यवसाय सुरू राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. पाेलीस चाैकीनजीक सुरू असलेल्या या व्यवसायाकडे पाेलिसांचे लक्ष गेले नाही, याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहेत. दररोज लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असून कडक निर्बंधांमुळे एकीकडे गावातील संपूर्ण व्यवसाय बंद असताना वरली मटक्याच्या या व्यवसायामुळे गाेरगरिबांचे संसार उघड्यावर येत आहेत. विशेष म्हणजे येथे शेलुबाजारसह परिसरातील बहुतांश गावातील लाेक जमत असल्याचे दिसून आले.
--------------
कोट:
शेलुबाजार येथे सुरू असलेल्या ताजी वरली मटका व इतर अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्यांवर धाडी टाकून त्यावर चाप बसविण्यात येईल.
-धनंजय जगदाळे
,
ठाणेदार, मंगरुळपीर.
शेलुबाजार तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी सुरू असलेल्या ताजी वरली मटका व अवैधरीत्या चालणाऱ्या व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित ठाणेदारांना देण्यात आले आहे. दोषींवर निश्चित कारवाई करण्यात येईल.
-वसंत परदेशी,
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम.