लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन (वाशिम) - थकित विजबिलापोटी वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे महावितरणकडून देण्यात येणाºया वीज देयकांत प्रचंड चुका असून, अव्वाच्या सव्वा देयक आकारले जात असल्याचा आरोप करीत देयकांतील चुकांची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह पदाधिकारी महावितरणच्या शिरपूर शाखा कार्यालयावर शुक्रवारी धडकले.महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना देण्यात येणाºया देयकांत मोठ्या प्रमाणात चुका असून काही ग्राहकांना वापरापेक्षा अधिक प्रमाणात विज देयक आकारणी करण्यात आले तर काही वीजग्राहकांना पूर्वीचेच भरलेले विज देयक पूर्ण लागून आल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच महावितरणकडून मागील दोन दिवसांपासून थकित देयक वसूल करण्यासाठी वीज जोडणी खंडित करण्याची मोहिम जोरात सुरू आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी चुकीच्या बिलाबाबत तसेच पुन्हा लागून येणाºया देयकाबाबत शिरपूर येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता अर्जुन जाधव यांच्याशी चर्चा केली. चुकीचे देयक ग्राहकांना देऊ नये असे ठणकावून सांगितले. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना चुकीच्या पद्धतीने वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा स्वत: खांबावर जोडून देईल असा इशारा दिला.दरम्यान, कनिष्ठ अभियंता जाधव म्हणाले की, थकित घरगुती वीज देयक बाकी असलेल्या ग्राहकांकडून वीज देयकाची वसुली करण्याची मोहिम महावितरणकडून सुरू आहे. ज्या ग्राहकांकडे थकीत देयक आहे व ते भरण्यास टाळाटाळ करणाºया ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. आणि ही कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे. विहित मुदतीनंतर भरल्या गेलेले देयक पुढील महिन्यात लागून येते; मात्र ते कमी करून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे कनिष्ठ अभियंता जाधव यांनी स्पष्ट केले.
चुकीचे देयक; शेतकरी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 3:57 PM