यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकाने मानोरा शेतशिवारात केला सहकारी शिक्षकाचा खुन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 07:37 PM2018-02-28T19:37:51+5:302018-02-28T19:37:51+5:30
मानोरा (वाशिम) - यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज आदिवासी आश्रम शाळेवरील एका शिक्षकाने, त्याच शाळेवर कार्यरत सहकारी शिक्षकाचा डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला मानोरा शहरालगत असलेल्या एका शेतशिवारात उघडकीस आली.
मानोरा (वाशिम) - यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज आदिवासी आश्रम शाळेवरील एका शिक्षकाने, त्याच शाळेवर कार्यरत सहकारी शिक्षकाचा डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला मानोरा शहरालगत असलेल्या एका शेतशिवारात उघडकीस आली. इमरान अनु नौरंगाबादी (३८) रा. दिग्रस असे मृतक शिक्षकाचे नाव असून, गोपाल गजाधरसिंग ठाकुर (३६) रा.नाईक नगर मानोरा असे आरोपीचे नाव आहे. या खूनाची कबूली आरोपीने स्वत:हून दिली.
मृतक इमरान अनु नौरंगाबादी व आरोपी गोपाल गजाधरसिंग ठाकुर या दोघांची दाट मैत्री होती. मैत्रीमुळे मृतकाचे गोपाल याच्याकडे नेहमी जाणे येणे होते. इमरानचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय गोपालच्या मनात बळावला होता. यातूनच गोपालने मृतकास मानोरानजीक असलेल्या चिस्तळा शेत शिवारात बोलावून, डोक्यावर लोखंडी रॉड मारुन ठार मारले, अशी माहिती समोर आली आहे. चिस्तळा शेत शिवारात विहिरीजवळ बांधकामासाठी असलेल्या कॉलमच्या खड्डयात मृतदेह पुरला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरूवातीला केला. दुसरीकडे इमरान हा तीन दिवसांपासून धरुन निघून गेल्याची तक्रार त्याचा भाऊ रमजान अन्नु नौरंगाबादे यांनी दिग्रस पोलिसात दिली होती . तीन दिवसांपासुन इमरान दिसत नसल्यामुळे त्याच्या जवळचा मित्र गोपाल ठाकुर याच्याकडे विचारणा केली. परंतु, त्याचा मोबाईल बंद असल्याने, मृतकाच्या नातेवाईकाने गोपाल ठाकुरचे घर गाठले असता, घराला कुलुप असल्याचे दिसून आले. गोपाल हा पुण्याला गेल्याचे सांगण्यात आले. यावरून मृतकाच्या नातेवाईकाचा गोपालवर संशय बळावला. दरम्यान, २८ फेब्रुवारीला सकाळी आरोपी गोपाल याने मानोरा पोलीस स्टेशन गाठून या खूनाची कबूली दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळाला भेट दिली. तहसीलदार पी.झेड. भोसले, पोलिस निरीक्षक रामकृष्ण मळघने यांनी सहकाºयाच्या मदतीने खड्ड्यात पुरून ठेवलेला मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच मानोरा पोलिस स्टेशनला एकच गर्दी झाली होती.
याप्रकरणी मृतकाचा भाऊ रमजान अनू नौरंगाबादे यांनी फिर्याद दिल्यावरुन मानोरा पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. या खून प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? या दृष्टिने तपास केला जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे, सुभाष महाजन, जगन्नाथ घाटे करीत आहेत.