यंदा केवळ सहा टॅंकरच्या आधारे निवळली पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 12:12 PM2021-06-14T12:12:11+5:302021-06-14T12:12:30+5:30
Water Scarcity in Washim : तीन तालुक्यांतील सहा गावांचा अपवाद वगळता इतर कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गतवर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १२० टक्के पर्जन्यमान झाले. त्यामुळे चालू वर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला तीव्र स्वरूपात पाणीटंचाईची झळ सहन करावी लागली नाही. तीन तालुक्यांतील सहा गावांचा अपवाद वगळता इतर कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही. विशेष म्हणजे ही गावेही आता पाणीटंचाईच्या विळख्यातून बाहेर पडत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात उद्भवलेल्या पाणीटंचाईबाबत गेल्या पाच वर्षांचा विचार झाल्यास २०१७ ते १०१९ या तीन वर्षांत जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. २०२० आणि २०२१ ही दोन वर्षे मात्र मुबलक पाणी उपलब्धतेची ठरली. गतवर्षी केवळ दोन गावांमध्ये टॅंकर लावावे लागले, तर चालू वर्षी कारंजा तालुक्यातील गिर्डा, धोत्रा देशमुख, रिसोड तालुक्यातील करंजी गरड, मालेगाव तालुक्यातील वरदरी बु., खैरखेडा आणि पिंपळवाडी या सहा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला.
प्रशासनाने ६९ गावांमध्ये ६८ विहिरींचे अधिग्रहण केले होते. यासह २८ ठिकाणी विशेष नळदुरुस्ती आणि चार ठिकाणी तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. उपाययोजनांवर साधारणत: १.८२ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकबुर्जी प्रकल्प भरण्याची प्रतिक्षा
वाशिम शहराला नजिकच्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी झालेल्या चांगल्या पर्जन्यमानामुळे चालुवर्षीच्या उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवली नाही. असे असले तरी एकबुर्जी प्रकल्पाची पाणीपातळी घटलेली आहे. १० ते १२ जून दरम्यान झालेल्या पावसाने ती काहीअंशी वाढली आहे. हा प्रकल्प तुडूंब भरण्याची प्रतिक्षा सर्वांनाच लागून आहे.