अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष; यावर्षीही परिस्थिती तशीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:50+5:302021-06-11T04:27:50+5:30
वाशिम : गतवर्षी आरटीई अंतर्गत ६०० च्या आसपास विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळाले होते. मात्र, कोरोनामुळे शाळा ...
वाशिम : गतवर्षी आरटीई अंतर्गत ६०० च्या आसपास विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळाले होते. मात्र, कोरोनामुळे शाळा बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष अभ्यासाविनाच घरात गेले. यंदाही कोरोनामुळे गतवर्षीचीच परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा पहिल्या लॉटरीत ६३० बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील बालकांना पहिल्या वर्गात २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यासाठी चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ७१८ जागा राखीव आहेत. ७ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या पहिल्या लॉटरी पद्धतीत १११९ अर्जातून ६३० बालकांची निवड झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे प्रवेश प्रक्रिया ठप्प होती. आता अनलॉक झाल्याने मोफत प्रवेश प्रक्रियाही निकाली निघाली आहे. दरम्यान यंदाही कोरोनाची परिस्थिती कायम राहिल्यास विद्यार्थ्यांना घरातच राहावे लागण्याचे संकेत आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणासाठी शासनाकडून साहित्य मिळावे अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहे.
०००
आरटीई अंतर्गत जिल्ह्यात किती शाळांची नोंदणी १०३
किती अर्ज आले १११९
किती जणांची निवड ६३०
०००००
गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी शासनाने साहित्यही द्यायला हवे !
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील बालकांना खासगी शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. मोफत प्रवेशासाठी यंदा ६३० बालकांची निवड झाली आहे.
यंदाही कोरोनाचे संकट कायम राहिल्यास शाळा सुरू होणे कठीणच आहे. त्यामुळे मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे मिळतील. गोरगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल, लॅपटॉप, टॅब आदी साहित्य खरेदी करणे आवाक्याबाहेरचे आहे.
आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील शासनाने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल, संगणक किंवा टॅब यापैकी एखादे साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंतराव धाडवे, राजकुमार पडघान यांनी केली आहे.
००००००
कोट बॉक्स
अनलॉकच्या टप्प्यात ११ जूनपासून मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत १०३ शाळांची नोंदणी झाली आहे. पहिल्या लॉटरी पद्धतीत जिल्ह्यातील ६३० बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. शाळांना संबंधित पालकांना प्रवेशाबाबत तारीख द्यावी लागणार आहे.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम
0000000
कोरोनामुळे गतवर्षी विद्यार्थ्यांना शाळेत जाताच आले नाही
कोट
कोरोनामुळे गेल्या वर्षी पहिली ते चौथीच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी बंदच होत्या. त्यामुळे शाळेविना विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. ऑनलाईन शिक्षणातही खंड होता.
- आशिष देशमुख,
पालक,
......
कोरोनामुळे गतवर्षी विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. शासनाने मोबाईल, संगणक द्यावे.
- योगेश उबाळे,
पालक,
.....
कोरोनामुळे यंदाही शाळा उघडतात की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या बालकांना ऑनलाईन शिक्षणासाठी शासनाने साहित्य पुरवावे.
- अमोल वानखडे,
पालक,