लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आजच्या धकाधकीच्या तथा व्यस्त जीवनात शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूत राहायचे असेल तर नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी येथे २१ जून रोजी केले. स्थानिक वाटाणे लॉन्समध्ये झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त वतीने आयोजित योगदिनाच्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, पतंजलीचे डॉ. भगवंतराव वानखेडे, आर्ट आॅफ लिव्हींगचे डॉ. हरीष बाहेती, विद्याभारतीचे दिलीप जोशी, स्वामी सत्यानंद योग केंद्राचे राम छापरवाल, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी म्हणाले, भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येकाने सुखी, संपन्न तथा निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगासनांचा नियमित सराव करायलाच हवा, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. वानखेडे, विजय चव्हाण, दीपा वानखेडे यांनी उपस्थितांना योगमुद्रा, ध्यानमुद्रा, वक्रासन, वज्रासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन, कपालभाती, प्राणायाम, भद्रासन यासह विविध योग शिकविले. पतंजली योग समिती, आर्ट आॅफ लिव्हिंग, विद्याभारती, स्वामी सत्यानंद योग केद्र, भारत स्वाभिमान, भारत स्काऊट आणि गाईड, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, लॉयन्स क्लब, नेहरु युवा केंद्रा, व्यंकटेश योग अभ्यास मंडळाच्या पदाधिकाºयांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी प्रास्ताविक केले. संचालन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटिये यांनी केले. उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी उप्पलवार यांनी मानले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूतीसाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी मोडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 4:33 PM