पांदन रस्त्याच्या कामासाठी सरसावले युवक़ ; प्रहार संघटनेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:18 PM2018-04-17T13:18:26+5:302018-04-17T13:18:26+5:30
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातीन शिवणी दलेलपूर ते चिंचोलीपर्यंतच्या पांदन रस्त्याचे काम करण्यासाठी गावकरी युवक सरसावले आहेत.
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातीन शिवणी दलेलपूर ते चिंचोलीपर्यंतच्या पांदन रस्त्याचे काम करण्यासाठी गावकरी युवक सरसावले आहेत. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलिपभाऊ भेंडेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पांदन रस्त्यामुळे ग्रामस्थांना येणाºया अडचणी श्रमदानातून दूर केल्या जाणार आहेत.
आसेगाव येथून जवळच असलेल्या शिवणी ते चिंचोली दरम्यान शेतशिवारातून दोन्ही गावांत येजा करण्यासह शेतातील मालाची ने-आण करण्यासाठी पांदन रस्ता आहे. तथापि, हा रस्ता वहिवाटीसाठी योग्य नसल्याने दोन्ही गावांतील शेतकरी व गावकºयांनी प्रशासन दरबारी वारंवार या रस्त्याचे काम करण्याची मागणीही केली; परंतु गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याचे काम करण्यात आले नाही. अखेर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलिपभाऊ भेंडेकर यांनी हा रस्ता श्रमदानातून करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी दोन्ही गावातील ज्येष्ठ आणि युवकांशीही त्यांनी चर्चा केली. त्यांची संकल्पना युवकांना आवडली आणि या रस्त्याच्या कामासाठी श्रमदान करण्याची तयारीही दर्शविली. त्यानुसार १५ एप्रिल रोजी प्रत्यक्ष दिलिभभाऊ भेंडेकर यांच्या नेतृत्वात या रस्त्याचे काम युवकांकडून सुरू करण्यात आले. या कामासाठी बंडू भगत, सुधाकर भगत, प्रमोद भेंडेकर, गणेश पाटील, मारुती भेंडेकर, भास्कर साहुकार, प्रकाश सिरसाट, गणेश खिल्लारे, संजय कांबळे, विजय साहुकार, महादेव दिनकर भेंडेकर, पांडुरंग भेंडेकर, गुलाब पाटील, श्रावण भालेराव, रविंद्र खिराडे आणि सारंग भेंडेकर या युवकांनी रस्त्याची साफसफाई करून डागडुजीच्या कामाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सांडपाण्याच्या निचºयासाठी जुने पाईपही रस्त्यावर बसविले. शिवणी आणि चिंचोली गावातील युवकांचा हा उपक्रम इतरांसाठी आदर्श ठरत आहे.