रिक्त पदासंदर्भात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी उपसले उपोषणाचे हत्यार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 06:34 PM2020-10-31T18:34:59+5:302020-10-31T18:35:19+5:30
Washim ZP News जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व सदस्य हे ऐन दिवाळीदरम्यान उपोषण आंदोलन छेडणार आहेत.
वाशिम : जिल्हा परिषदेतील वर्ग एक व दोन दर्जाची ६४ पदे रिक्त असतानाही, ही पदे भरण्याबाबत शासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व सदस्य हे ऐन दिवाळीदरम्यान उपोषण आंदोलन छेडणार आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. त्यानंतर राज्यातील चार जिल्हा परिषदेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढल्या. त्यापैकी वाशिम जि.प. वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. राज्यात आणि जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता आहे; परंतू, रिक्त पदे भरण्यासंदर्भात राज्य शासनाने वाशिम जिल्हा परिषदेकडे जणू पाठच फिरविली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा अपवाद वगळता अजूनही जिल्हा परिषदेत वर्ग एक व दोन दर्जाची ६४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे यापूर्वीच मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजिता पवार यांच्याकडेही मागणी केली. परंतू, यावर कोणतीच ठोस कार्यवाही नसल्याने रिक्त पदांचा तिढा कायम आहे. रिक्त पदांमुळे जिल्हा परिषदेंतर्गतची विकास कामे ठप्प आहेत. एरवी आंदोलने, मोर्चे काढून सरकारविरोधात दंड थोपाटणारा विरोधी पक्षदेखील याबाबत फारसा गंभीर नसल्याचे दिसून येते. रिक्त पदांचा तिढा सोडविण्यासाठी शेवटी जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व सदस्य एकवटले असून, दिवाळीपूर्वी रिक्त पदे न भरल्यास आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. त्यानुसार धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, नरक चतुर्दशीच्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे तर भाऊबीजच्या दिवशी थेट मंत्रालयासमोर मुंबई या ठिकाणी उपोषण आंदोलन छेडणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले.