अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘समग्र शिक्षा अभियाना’अंतर्गत विद्यार्थ्यांची माहिती एसडीएमएस (स्टुडंट्स डाटा मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीवर नोंदविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यादरम्यान महाराष्ट्रात चक्क १४४२ विद्यार्थी तृतीयपंथी आढळले आहेत. त्यामुळे ही प्रणाली हाताळणारे अधिकारीही बुचकळ्यात पडले असून या माहितीची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हास्तरीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, पोषण आहार आदी योजना सर्वशिक्षा अभियानातून राबविल्या जातात. त्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांची शाळानिहाय माहिती एसडीएमएस प्रणालीत आॅनलाइन केली जात आहे. शाळांनी गेल्या वर्षभरात सरल, यु-डायसमध्ये नोंदविलेली माहिती एसडीएमसवर ‘पोर्ट’ करण्यात आली. मात्र ती योग्य आहे किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली आहे. राज्यातील १० लाख ५ हजार ६१२ शाळांचीच एसडीएमएसमध्ये नोंद झाली आहे. आतापर्यंत १ कोटी १ लाख ५६ हजार ११८ मुलांची, तर ८९ लाख ८९ हजार ६४९ मुलींची नोंद झाली. १४४२ विद्यार्थ्यांची नोंद तृतीयपंथी म्हणून करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय आढळलेले तृतीयपंथी विद्यार्थीमुंबई २२१, पुणे १७४, ठाणे १०३, नांदेड ८८, पालघर ८०, बिड ६५, सोलापूर ५९, नागपूर ५१, अहमदनगर ४८, जळगाव ४४, सांगली ४३, कोल्हापूर ३९, औरंगाबाद ३४, रायगड ३१, लातूर ३१, यवतमाळ ३०, नाशिक २९, नंदूरबार २३, धुळे २२, अकोला २१, अमरावती २०, सातारा २०, परभणी १६, जालना १५, हिंगोली १३, रत्नागिरी ११, वाशीम ०९, भंडारा ०९, चंद्रपूर ०९, बुलडाणा ०८, वर्धा ०८, उस्मानाबाद ०८, सिंधुदुर्ग ०८, गडचिरोली ०७.