राज्यात दीड लाख कामगारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:19 PM2018-03-29T22:19:44+5:302018-03-29T22:19:44+5:30
राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा धडाकाच कामगार आयुक्तालयाने सुरू केला आहे. अवघ्या महिनाभरात १ लाख ५१ हजार ८४१ कामगारांची नोंदणी करण्यात आली.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा धडाकाच कामगार आयुक्तालयाने सुरू केला आहे. अवघ्या महिनाभरात १ लाख ५१ हजार ८४१ कामगारांची नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे, एकूण लक्ष्यांकाच्या अर्ध्याहून अधिक झालेली ही नोंदणी केवळ महिनाभरात पूर्ण झाली आहे.
बांधकाम कामगारांसाठी विविध सोयी सवलतीच्या योजना राज्य राबविल्या जातात. मात्र, अनेक कामगार नोंदणीच करीत नसल्याने ते लाभापासून वंचित राहतात. अशा स्थितीत मुळचे यवतमाळ येथील असलेले नरेंद्र पोयाम यांनी मुंबईत कामगार आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच नोंदणीच्या प्रक्रियेत सहजता आणली गेली. कामगारांपर्यंत नोंदणीबाबत माहिती पोहोचविण्यात आली. नोंदणीसाठी विविध ठिकाणी सुविधा देण्यात आली. त्यातून राज्यभरात एकंदर अडीच लाख बांधकाम कामगारांची नोंदणीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते.
२३ फेब्रुवारी ते २३ मार्च या एका महिनाभराच्या कालावधीतच दीड लाखांहून अधिक कामगारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. यात नागपूर विभागात २२ हजार ७१३, अमरावती विभागात १३ हजार ७१३, पुणे विभागात ३६ हजार ६७८, मुंबई विभागात ५८ हजार ४२०, नाशिक विभागात १० हजार ३३७ तर औरंगाबाद विभागात ९ हजार ९८० कामगारांची नोंदणी केली आहे.
कामगारांसाठी आयुक्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात
राज्यभरातील कामगारांना योजनांची माहिती व्हावी यासाठी राज्याचे कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम आकाशवाणीवरून संवाद साधणार आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वरिष्ठ सहायक संचालक वर्षा फडके यांनी आयुक्तांची मुलाखत घेतली आहे. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून ही मुलाखत ३० आणि ३१ मार्चला सकाळी ७.२५ वाजता प्रसारित होणार आहे. कामगार कल्याणाच्या योजना, नोंदणीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे, कामगारांच्या पाल्यांना दिले जाणारे लाभ आदींची माहिती यात आयुक्त पोयाम सांगणार आहेत.