यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात निसर्गाचा प्रकोप थांबायला तयार नाही. या परिस्थितीत पीक विमा उतरविलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे तत्काळ मदतीसाठी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ३२ लाख तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना एक हजार आठ कोटी रुपये लागणार आहेत. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी, अशा राज्य शासनाच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात अजूनही मदत मिळालेली नाही.
पावसाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जुलैपासून सुरु झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत थांबायला तयार नाही. ऑक्टोबर महिन्यात पावसाची फाईल बंद होते. मात्र, परतीच्या पावसाने ही फाईल उघडण्याची वेळ आली आहे. पिके मातीमोल होत असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात ९१ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील ४५ लाख ७२ हजार ९५८ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ३२ लाख ३४ हजार १०१ तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. १३ लाख तक्रारींचे पंचनामे व्हायचे आहेत. सर्वेक्षण करताना ३२ लाख तक्रारींपैकी १३ लाख ३५ हजार ९८५ तक्रारी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरलेल्या आहेत. त्यासाठी एक हजार आठ कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना द्यावे लागणार आहेत.
राज्यात पाच विमा कंपन्यांकडे पीक विम्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक परिस्थिती निसर्ग प्रकोप निर्माण झाला, तर ७२ तासांत तक्रारी दाखल करता येतात. पीक विमा कंपन्यांची साईट बंद असल्याने ऑफलाइन तक्रारी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंचनामे झाल्यानंतर तत्काळ २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम देणे बंधनकारक आहे. १९१ तालुक्यांतील मंडळांमध्ये ही अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. याठिकाणी पंचनामे अपूर्ण आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता आहे. या परिस्थितीत कंपनीने दिवाळीपूर्वी मदत द्यावी, अशा सूचना आहेत. त्यादृष्टीने राज्यस्तरावरून आढावा घेतला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही.
यवतमाळ जिल्ह्यातून ९० टक्के तक्रारी
यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख १५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. यातील चार लाख दोन हजार ५७२ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी साडेतीन लाख तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ९० टक्के तक्रारी असल्याने याठिकाणी अधिसूचना निघाली नाही. सर्वच शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.
सर्वेक्षण बाकी असलेले मंडळ
*जिल्हा - मंडळ*
- नागपूर - २२२
- चंद्रपूर - ३०
- परभणी - ८
- अकोला - २४
- वर्धा - १४७
- अमरावती - ७०
- लातूर - ६
- उस्मानाबाद - १५
- गडचिरोली - १३
- सोलापूर - ३१
- नांदेड - २४८