मनसेचा राडा : पोस्टर जाळले, शिकवणी वर्गाच्या संचालकाला ‘समज’ वणी : शहरातील नांदेपेरा मार्गावर असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर एका खासगी शिकवणी वर्गाचे जाहिरात पोस्टर लावण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर पोस्टर काढून त्याची होळी केली, तर संबंधित खासगी शिकवणी वर्गाच्या कार्यालयात जाऊन चांगलाच राडा केला. मुजोरी करणाऱ्या एका शिक्षकाच्या कानशिलात लगावण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जोपर्यंत संबंधित खासगी शिकवणी वर्गाकडून जाहीररित्या माफी मागितली जात नाही, तोपर्यंत शिकवणी वर्ग सुरू करू दिले जाणार नाही, असा गर्भित इशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे. मंगळवारी सकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर पोस्टर लावण्यात आले. त्यामुळे संपूर्ण स्मारक झाकल्या गेले. ही बाब कळल्यानंतर मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, माजी नगरसेवक धनंजय त्रिंबके, ईरफान खान, आजिद शेख, नितीन ताजने, प्रशांत गाऊत्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते स्मारकाजवळ पोहचले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरील खासगी शिकवणी वर्गाच्या जाहिरातीचे पोस्टर खाली उतरवून त्याला पेटवून दिले. त्यानंतर उंबरकर यांनी शिकवणी वर्गाच्या संचालकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याला स्मारकाजवळ बोलाविले. मात्र लगेच पोहचतो असे सांगून सदर संचालक शिकवणी वर्गातून थेट चंद्रपूरकडे रवाना झाला. बराच वेळ प्रतीक्षा करूनही संचालक न आल्याने उंबरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्थानिक ढुमेनगरमधील शिकवणी वर्गाचे कार्यालय गाठले. तेथे काही शिक्षकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर उंबरकर यांनी त्यांपैैकी एकाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वातावरण तापले. काही शिक्षकांनी पुढे येऊन माफी मागितली. मात्र जोपर्यंत जाहिररित्या माफी मागितली जाणार नाही, तोपर्यंत शिकवणी वर्ग सुरू होणार नाही, अशी तंबी मनसेतर्फे देण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)
वणी येथे शिवसेना प्रमुखांच्या स्मारकावर जाहिरातीचे पोस्टर
By admin | Published: March 29, 2017 12:31 AM