१० दिवसानंतरही पोषण आहार नाही
By admin | Published: July 6, 2015 02:33 AM2015-07-06T02:33:10+5:302015-07-06T02:33:10+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन दहा दिवस होत असताना अद्यापही नेर तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार सुरू करण्यात आला नाही.
पांडुरंग भोयर सोनखास
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन दहा दिवस होत असताना अद्यापही नेर तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित राहावे लागत आहे. पोषण आहाराचे साहित्यच नसल्याने विद्यार्थ्यांना आहार कसा द्यावा, असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढावी, यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे पोषण आहारदेखील नियमित पुरविला जात नाही. त्यामुळे आहे ते विद्यार्थीदेखील या शाळांमधून बाहेर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. शाळांमधून शालेय पोषण आहारच दिला जात नसल्याने पालकवर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढावी तसेच त्यांना आरोग्यदायी जीवन जगता यावे या हेतूने शासनाने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. परंतु या योजनेला नेर तालुक्यात हरताळ फसल्याचे चित्र आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९१ शाळा आहे तर खासगी ४२ आणि नगरपरिषदेच्या सात शाळा आहेत. २६ जूनला शाळा सुरू झाल्या आहे. परंतु तालुक्यातील बहुतांश शाळेत पोषण आहारच दिल्या जात नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर होणार आहे. या शाळांमध्ये शिकणारी जास्तीत जास्त मुलेही गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळतो.
आपला पाल्य शाळेत जेवत असल्यामुळे पालकही बिनधास्त असतात. परंतु आता पालकांना विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागत आहे. विद्यार्थी शाळेतून उपाशीच घरी येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. काही शाळांशी संपर्क साधला असता शासनाकडून तांदूळाचा पुरवठाच झाला नसल्याचे सांगण्यात आले.