अखेर सालगड्याचा मुलगा डॉक्टर होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:27 PM2018-07-14T22:27:54+5:302018-07-14T22:29:15+5:30

जीव तोड मेहनत करून सालगड्याने मुलाला शिकविले. मुलानेही अपार कष्ट करत नीट परीक्षा उत्तीर्ण केली. एमबीबीएसला नंबरही लागला. पण प्रवेश फी भरण्याची सोयच नसल्याने त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहणार होते.

After all, the son of the stepdaughter will become a doctor | अखेर सालगड्याचा मुलगा डॉक्टर होणारच

अखेर सालगड्याचा मुलगा डॉक्टर होणारच

Next
ठळक मुद्देप्रवेश फी भरली : मूळ उमरखेडचे पुण्यातील व्यावसायिक आले मदतीला धावून

अविनाश खंदारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : जीव तोड मेहनत करून सालगड्याने मुलाला शिकविले. मुलानेही अपार कष्ट करत नीट परीक्षा उत्तीर्ण केली. एमबीबीएसला नंबरही लागला. पण प्रवेश फी भरण्याची सोयच नसल्याने त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहणार होते. ‘लोकमत’ने ही कहाणी प्रकाशित करताच अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यातच मुळचे उमरखेडचे आणि आता पुण्यात यशस्वी व्यावसायिक असलेले विवेक मामीडवार यांनी या मुलाच्या संपूर्ण शिक्षणासह राहण्या-जेवणाचा खर्चही स्वत: करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अखेर सालगड्याचा मुलगा डॉक्टर होणारच आहे.
बंदीभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम जेवली गावातील गुलाब पडवाळे यांचा मुलगा अरविंद याने ‘नीट’मध्ये ३९३ गुण मिळवले. त्याचा ‘एमबीबीएस’साठी मुंबई येथील लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजला नंबरही लागला. परंतु, प्रवेश शुल्कासह निवासासाठी पैशाची व्यवस्थाच नव्हती. आई शेतमजुरी करणारी व वडील सालगाडी म्हणून राबणारे. त्यामुळे ‘सालगड्याच्या मुलाचा एमबीबीएस प्रवेश अडला’ या मथळ्याचे वृत्त ‘लोकमत’ने ९ जुलै रोजी प्रकाशित केले.
त्याची दखल विडूळ येथील आदर्श शिक्षक स्व. शंकरराव मामीडवार आणि शिक्षिका नंदाताई मामीडवार यांच्या मुलाने घेतली. विवेक मामीडवार त्यांचे नाव. अरविंद गुलाब पडवाळे या मुलाच्या एमबीबीएसच्या ५ वर्षांची पूर्ण फी, पुस्तके, इतर साहित्य तसेच मुंबत राहणे, जेवण यासह शिक्षण होईपर्यंत लागणारा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी विवेक मामीडवार यांनी स्वीकारली. यातूनच १२ जुलै रोजी अरविंदची फी भरून त्याचा एमबीबीएस प्रवेशही निश्चित करण्यात आला.
‘लोकमत’चे मानले आभार
अरविंद पडवाळेची बातमी ‘लोकमत’मधून प्रकाशित होताच अनेकांनी दखल घेतली. त्यात विवेक मामीडवार यांनी साडेपाच वर्षांचा अंदाजे १० लाखांपर्यंतचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली. याचे सर्व श्रेय ‘लोकमत’लाच असल्याची भावना अरविंदचे वडील गुलाब तलुसिंग पडवाळे यांनी व्यक्त केली. काबाडकष्ट करून शिकविलेला आपला मुला आता डॉक्टर होणार, या कल्पनेने आई पतियाबाई आणि वडील गुलाब पडवाळे यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या होत्या.
बिल्डरने जन्मभूमीशी जपले नाते
विवेक मामीडवार पुण्यात बिल्डर म्हणून व्यवसाय करतात. मामीडवार परिवार उमरखेड तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमात सढळ हाताने मदत करते. आई वडिलांच्या संस्कारातूनच हे काम सुरू असल्याचे विवेक मामीडवार म्हणाले. वडील शंकरराव मामीडवार यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. आई नंदाताई मामीडवार यांच्या मार्गदर्शनात तीन भाऊ समाजाशी नाळ जुळवून आहेत. डॉ. सचिन मामीडवार हे उमरखेडला, विवेक मामीडवार पुण्यात, तर राजेश मामीडवार अमेरिकेत असतात. परंतु, उमरखेड तालुक्यातील जेवलीच्या मुलासाठी मदत पाठवून त्यांनी आपल्या जन्मभूमीशी नाते कायम राखले.

Web Title: After all, the son of the stepdaughter will become a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.