वातानुकूलित तीन मजली अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 09:57 PM2019-07-20T21:57:42+5:302019-07-20T21:59:05+5:30

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या विद्यार्थ्यांसाठी आता यवतमाळ नगरपरिषद अद्ययावत अभ्यासिका केंद्र साकारत आहे. ही तीन मजली इमारत पूर्णपणे वातानुकूलित राहणार आहे.

Air conditioned three-floor study room | वातानुकूलित तीन मजली अभ्यासिका

वातानुकूलित तीन मजली अभ्यासिका

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । यवतमाळात विद्यार्थ्यांची सोय : ई-लायब्ररी, समुपदेशन, प्रत्येक टेबलवर संगणक

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या विद्यार्थ्यांसाठी आता यवतमाळ नगरपरिषद अद्ययावत अभ्यासिका केंद्र साकारत आहे. ही तीन मजली इमारत पूर्णपणे वातानुकूलित राहणार आहे. विशेष म्हणजे, पुस्तकांसह संगणकांची रेलचेल येथे राहणार असून तज्ज्ञांकडून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी समुपदेशनही केले जाणार आहे. ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका केंद्र’ येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत विद्यार्थ्यांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.
दारव्हा मार्गावर शकुंतला रेल्वेस्थानकाच्या पुढील जागेत या अभ्यासिका केंद्राची टोलेजंग इमारत सध्या निर्माणाधीन आहे. राजस्थानातील जवळपास दीडशे कारागीर या केंद्राला खास राजस्थानी ‘लूक’ देण्यासाठी झटत आहेत. नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका केंद्रासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
अशी असेल तीन मजल्यांची रचना
तळमजल्यावर ई-लायब्ररी राहणार आहे. जवळपास दीडशे टेबल राहणार असून प्रत्येक टेबलवर संगणक दिला जाणारआहे. वेगवान इंटरनेट कनेक्टिवीटी दिली जाणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला एखादी माहिती तातडीने मिळवायची असल्यास त्याला देशातील कोणत्याही नामवंत संस्थेशी लगेच ‘कनेक्ट’ होता येणार आहे. वरच्या पहिल्या मजल्यावर विद्यार्थ्यांना आरामात बसून वाचन करण्याची सुविधा राहणार आहे. शिवाय या मजल्यावर पुस्तकांचा अद्ययावत संग्रह उपलब्ध राहणार आहे. तर शेवटच्या मजल्यावर समुपदेशनासाठी ऐसपैस सभागृह राहणार असून तेथे एलईडी प्रोजेक्टर देण्यात येणार आहे. आयआयटी खडकपूरसारख्या संस्थांमधील तज्ज्ञही या प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकणार आहेत. या केंद्राला देशभरातील संस्थांची संलग्नता मिळविली जाणार आहे. १५ आॅगस्टपर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प बांधकाम अभियंते आणि कंत्राटदाराने बोलून दाखविला आहे.
‘मिसाईल मॅन’चे पोर्ट्रेट
अभ्यासिका केंद्राच्या टोलेजंग इमारतीसाठी खास जोधपुरी स्टोन वापरले जात आहेत. तर केंद्राच्या प्रवेशस्थळी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे भव्य पोर्टेट लावले जाणार आहे. राजस्थानातील कारगीर सध्या या पोर्टेटसाठी जोधपुरी दगडांवर कारीव काम करीत आहेत. डॉ. कलाम यांच्या मुद्रेसह भारताची राजमुद्रा, वंदेमातरम् कोरले जात आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या भव्य मुद्रेतून प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांना वाचनाचा व्यासंग आणि संशोधक वृत्तीची प्रेरणा मिळणार आहे.
सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांची देखरेख
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, यवतमाळचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपेल्लीकर, उपअभियंता प्रवीण कुलकर्णी यांच्या देखरेखीत या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
अंध विद्यार्थ्यांसाठी खास सोय
डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका केंद्रात सर्वसाधारण विद्यार्थ्यांसोबतच अंध विद्यार्थ्यांसाठीही विशेष सुविधा राहणार आहे. त्यांच्यासाठी ब्रेल लिपीतील पुस्तके येथे ठेवली जाणार आहेत. अभ्यासिका केंद्रात बसणाºया विद्यार्थ्यांना एकग्रतेसाठी निरव शांतता लाभावी म्हणून अभ्यासिकेच्या भिंती ‘अ‍ॅकॉफ्सिक’ पद्धतीने तयार केल्या जात आहेत. त्यामुळे कुणी बोलले तरी आवाज घुमणार नाही. येत्या १५ आॅगस्टपर्यंत इमारतीचे संपूर्ण काम पूर्ण करून स्वातंत्र्यदिनाला उद्घाटनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्घाटनानंतर जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत येथील कामकाज चालणार आहे.

Web Title: Air conditioned three-floor study room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.