‘आरटीओ’वर प्रहारचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 09:51 PM2019-07-20T21:51:32+5:302019-07-20T21:52:07+5:30
आवश्यक कागदपत्रे नसलेल्या आॅटोरिक्षांवर वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाने शहरात शनिवारी धडक मोहीम राबवून २५ आॅटोरिक्षांवर कारवाई केली. याविरुद्ध आॅटोरिक्षा चालक-मालक व प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने बंद पुकारला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आवश्यक कागदपत्रे नसलेल्या आॅटोरिक्षांवर वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाने शहरात शनिवारी धडक मोहीम राबवून २५ आॅटोरिक्षांवर कारवाई केली. याविरुद्ध आॅटोरिक्षा चालक-मालक व प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने बंद पुकारला होता. सकाळी झालेल्या बैठकीतही तोडगा निघू न शकल्याने प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला.
सकाळी ११ वाजता आॅटोरिक्षा चालक मालक संघटनेतील युनूस खान, शंकर लोहवे, संदीप बेलखेडे यांचे शिष्टमंडळ, सहाय्यक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, शहर ठाणेदार धनंजय सायरे, अवधुतवाडीचे ठाणेदार आनंद वागदकर यांची सयुंक्त बैठक झाली. यामध्ये कारवाई केलेल्या आॅटोरिक्षाच्या दंडाच्या रकमेवर तोडगा निघाला नाही. मात्र प्रकरण कोर्टात पाठविण्याचा निर्णय झाला. शिवाय कारवाईला आठ दिवसांची स्थगिती देण्यात आली. बैठक आटोपल्यानंतर दंडाच्या रकमेसाठी प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने बसस्थानक चौकातून आरटीओ कार्यालयावर मोर्चा नेला. येथे दंडाच्या रकमेबाबत चर्चा झाली. मात्र तोडगा निघाला नाही. शेवटी ही प्रकरणे कोर्टात सादर करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. सहायक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी ती मान्य केले. ठाणेदार धनंजय सायरे यांनी चोख बंदोबस्त लावला होता. चर्चेनंतर आॅटोरिक्षा चालकांनी आंदोलन मागे घेतले. मोर्चात प्रामुख्याने नगरसेवक नितीन मिर्झापुरे, बिपीन चौधरी सहभागी होते.