अकोलाबाजार : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेतील तिजोरी अज्ञात चोरट्यांनी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी वजनी असल्याने चोरटे यशस्वी झाले नाही. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अकोलाबाजार येथे घडली. २००३ मध्ये चोरट्यांनी याच बँकेची तिजोरी पळवून नेली होती. अकोलाबाजार येथे ग्रामपंचायतीच्या इमारतीत ग्रामीण बँकेची शाखा आहे. मंगळवारी बँकेचे कामकाज आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे बंद करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला. बँकेत ठेऊन असलेली सात क्ंिवटल वजनाची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी फुटत नसल्याचे पाहून भिंत फोडून तिजोरी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातही यश आले नाही. बुधवारी सकाळी रोखपाल बँकेत आले असता चोरीचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. बँकेतील संगणक व सर्व रेकॉर्ड सुस्थितीत होते. या घटनेची माहिती शाखा व्यवस्थापक डी.एम. रोडे यांनी वडगाव (जंगल) पोलीस ठाण्यात दिली. ठाणेदार जी.एस.खाडे यांनी बँकेला भेट देऊन पाहणी केली. तसेच क्षेत्रीय प्रबंधक शिशीर देशमुख, वरिष्ठ व्यवस्थापक गरकल, अनिल महामुने हेही बँकेत पोहोचले. घटनास्थळावर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. (वार्ताहर)
ग्रामीण बँकेची तिजोरी पळविण्याचा प्रयत्न
By admin | Published: July 17, 2014 12:20 AM