बाबा हुंड्यावर ठाम, मुलगा मात्र लग्नाविना बनला ‘पोपटलाल’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 11:19 AM2021-11-02T11:19:46+5:302021-11-02T12:52:48+5:30
वडीलधाऱ्या मंडळींच्या गडगंज हुंड्याच्या मागणीमळे समाजातील शेकडो लग्नाळू मुले कित्येक वर्षांपासून लग्नासाठी तळमळत आहेत. वयाची चाळीशी उलटल्यावरही लग्नाविना जगत आहेत.
यवतमाळ : वर्षानुवर्ष मुलगीच न मिळाल्याने लग्नासाठी तळमळणारा एका टीव्ही मालिकेतील ‘पत्रकार पोपटलाल’ सर्वांनाच ठावुक आहे. मात्र वडीलधाऱ्या मंडळींच्या गडगंज हुंड्याच्या मागणीमळे समाजातील शेकडो लग्नाळू मुले कित्येक वर्षांपासून लग्नासाठी तळमळत आहेत. वयाची चाळीशी उलटल्यावरही लग्नाविना जगत आहेत.
जेवढे अधिक शिक्षण तेवढा अधिक हुंडा हे विचित्र समीकरण समाजात रूढ झाले आहे. त्यामुळे कायदा मोडून हुंडा दिला आणि घेतला जात आहे. मात्र गरीब घरातील उच्चशिक्षित मुला-मुलींचा खोळंबा होत आहे.
मुली म्हणतात, शेतकरी मुलगा नको गं बाई !
शेती हा हक्काचा व्यवसाय असला तरी सध्या तोट्यात चालला आहे. त्यामुळे कोणत्याही मुलीच्या वडिलांना आपला जावई केवळ शेतकरी असलेला चालत नाही. चपराशी असला तरी चालेल, पण शेतकरी मुलगा नकोच, अशी अट टाकली जात आहे.
एकीकडे हुंड्यांमुळे अनेकांच्या लग्नावर गदा आलेली असताना दुसरीकडे आधुनिक काळातील वधू-वर सूचक मंडळांनी अक्षरश: दलाली सुरू केली आहे. भक्कम शुल्क आकारून येथे लग्नाळू मुला-मुलींची नोंद केली जाते. ग्रामीण भागातील अनेक मुलींचे पलक तर या मंडळाकडे जायला अजूनही घाबरत आहेत. मात्र, आता नव्या काळात पालकांनी सामूहिक विवाह मेळावे, नोंदणी पद्धतीने होणारे विवाह या पद्धतींचा अवलंब केल्यास लग्नातील हुंडा व अन्य खर्च आटोक्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर, सुशिक्षितांनी स्वत: हुंडा नाकारावा, असाही विचार पुढे येत आहे.
कमी पगाराच्या मुलांची आणखी अडचण
मासिक ४० हजार हाती आले तरी सध्याच्या महागाईत घर चालविणे कठीण होत आहे. त्यामुळे दहा-वीस हजारांची नोकरी करणाऱ्यांना लग्नासाठी मुली मिळणे अक्षरश: कठीण झाले आहे.
वयाची तिशी ओलांडली, हात पिवळे कधी होणार
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याकडे मुलींचा कल वाढला आहे. त्यामुळे अधिकाधिक शिक्षण घेताना वय वाढत आहे. ३०-३५ वर्षानंतर अशा मुलींना मुलगा मिळणे कठीण जात आहे.