वावटळीत सापडलेल्या ३० निराधार कोवळ्या कळ्यांचा ‘बाबूल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:00:31+5:30
प्रकाश चव्हाण असे या ‘पित्या’चे नाव. तर त्याने पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेल्या २५-३० पोरींची नावे जाहीर करण्यावर कायद्याचे बंधन आहे. कारण पारधी बेड्यावर, पोडावर उगवलेल्या या कळ्यांना त्यांच्या जन्मदात्यांनीच पोटासाठी भिकेला लावले होते. काही तर चक्क गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या पोटी जन्माला आलेल्या. त्यांना शिकविणे, खाऊ घालणे तर दूरच पण मायेने कुरवाळण्याचीही फुरसद या ‘नैसर्गिक’ बापांना नव्हती.
रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!
30 मुली दुर्बल, वंचित घटकातील निराधार मुलींना आपल्या वसतिगृहात आधार देऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना प्रकाश चव्हाण.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लेकरू थकले तर कुरवाळणारा, शिकले तर कौतुक करणारा आणि चुकले तर गालफाडात थापड मारणारा बाप असतो. लेकरांना राग आला तरी कठोर चेहऱ्याने आणि आतल्या काळजीने तो लेकरांसाठीच धडपडत राहतो. पण अनेक अबोध बालिकांच्या नशिबी बालपणापासूनच हे पितृछत्र येत नाही. समाजातली दुष्ट प्रवृत्ती अशा कोवळ्या कळ्यांना कुस्करण्यासाठी चवताळलेलाच असतो. त्या विखारी नजरांपासून निराधार पोरींना वाचवित आईची माया देणाऱ्या ‘बाप माणसा’ची ही पुरोगामी कथा.
प्रकाश चव्हाण असे या ‘पित्या’चे नाव. तर त्याने पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेल्या २५-३० पोरींची नावे जाहीर करण्यावर कायद्याचे बंधन आहे. कारण पारधी बेड्यावर, पोडावर उगवलेल्या या कळ्यांना त्यांच्या जन्मदात्यांनीच पोटासाठी भिकेला लावले होते. काही तर चक्क गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या पोटी जन्माला आलेल्या. त्यांना शिकविणे, खाऊ घालणे तर दूरच पण मायेने कुरवाळण्याचीही फुरसद या ‘नैसर्गिक’ बापांना नव्हती. अखेर प्रकाश चव्हाण यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना यवतमाळात सुरक्षित केले. भाड्याच्या घरात त्यांच्यासाठी वसतिगृह निर्माण केले. महिना चार हजार रुपये भाडे आणि दहा हजार रुपयांचा किराणा भागविण्यासाठी ते कधी पदरमोड करतात तर कधी लोकवर्गणीसाठी पदर पसरतात. ‘आम्ही साऱ्या सावित्री’ असे नाव देऊन चालणारे हे वसतिगृह जणू सावित्रीबार्इंचाच वसा चालवित आहे. मूळचे हिवरा बु. येथील आणि आता बडनेऱ्याच्या महाविद्यालयात ग्रंथपाल असलेले प्रकाश चव्हाण यांनी स्वत: गरिबी भोगल्यानंतर हे पुरोगामी पाऊल उचलले आहे. त्यामुळे अकोला बाजार, वाघाडी, सावळी, गोपालनगर, धामणी, चिंचोली ता. दिग्रस, आसेगाव ता. बाभूळगाव, आजंती ता. नेर तसेच वाशिम जिल्ह्यातील खिनकिन्ही येथील मुलींना त्यांनी आधार दिला.
यातील अनेक मुली हैदराबाद, चेन्नईमध्ये कामाला होत्या. सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात वसतिगृहात अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. मात्र आम्ही त्यावर मात करीत सर्वांचा उदरनिर्वाह आणि शिक्षणाची व्यवस्था करीत आहोत.
-इशू माळवे आणि पपिता माळवे, वसतिगृहातील काळजीवाहक
या मुलींना वसतिगृहात ठेऊन आजूबाजूच्या शाळेत त्यांच्या वयानुसार दाखल केले आहे. आता ई-क्लास जमिनीवर तट्ट्याच्या चार खोल्या आम्ही उभारत आहोत. सध्या कोरोनाच्या संकटापायी अनेक गोरगरीब आपल्या मुलींचे बालविवाह करण्याच्या मन:स्थितीत आहे. अशा २० मुली आम्ही शोधल्या.
-प्रकाश चव्हाण
वसतिगृह संचालक