महात्मा फुले-आंबेडकर स्मृती पर्वाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:46 PM2017-11-29T23:46:56+5:302017-11-29T23:47:09+5:30
महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाला मंगळवारपासून येथील आझाद मैदानात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अॅड. अशोक बसोत्रा यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर उहापोह केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाला मंगळवारपासून येथील आझाद मैदानात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अॅड. अशोक बसोत्रा यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर उहापोह केला.
‘भारतीय संविधान व सामाजिक वास्तव आणि फुले-आंबेडकरी विचारधारा’ या विषयावर अॅड. बसोत्रा यांनी विचार मांडले. ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. मंडल आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे लागू व्हाव्या, शिष्यवृत्ती, पदोन्नती तसेच संसदेत ओबीसींना संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. भारतात समतामुलक समाजाची निर्मिती होणे काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी आपला हक्क व अधिकाराची लढाई आपल्याला स्वत: लढावी लागेल. ज्यांनी आपल्या वाट्याला समस्या निर्माण केल्या, तेच लोक आपली समस्या सोडवितील या भ्रमात ओबीसींनी राहू नये, असे ते म्हणाले.
भारतीय संविधानात बाबासाहेबांनी ओबीसींसाठी अनेक तरतुदी करून ठेवलेल्या आहे. मात्र आतापर्यंतचे कुठलेही सरकार ओबीसींच्या हिताचे निर्णय घेऊ शकलेले नाही. ओबीसीच्या मतांच्या भरवशावर सरकार बनले. मात्र त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळू दिले नाही. परिणामी आज ओबीसींची अवस्था दयनीय झाली आहे. हे वेळीच बदलले नाही तर परिस्थिती यापेक्षाही गंभीर स्वरूप धारण केल्याशिवाय राहणार नाही, असे अॅड. अशोक बसोत्रा यावेळी म्हणाले.
यावेळी अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश पिसे, शासकीय मुद्रण व प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. दिलीप घावडे, राजेश देवके, लक्ष्मीकांत लोळगे, सुनीता काळे, माया गोबरे आदी उपस्थित होते. प्रारंभी सायली तिखे, शीतल फसाटे, नितीन वाघ, उषा खटे, गोपाल धोबे, सार्थक तिखे, प्रशांत उमरतकर, मीनाक्षी काळे, स्नेहल मदनकर, सायली वाघ आदींनी महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित गीते सादर केली. यशस्वीतेसाठी अशोक तिखे, डॉ. विजय कावलकर, प्रा. सविता हजारे, कल्पना मादेश्वर, कमल खंडारे, नीता दरणे, माधुरी फेंडर, काशीनाथ लाहोरे, संजय ढाकुलकर, दीपक वाघ, प्रफुल्ल खेडकर, दत्ता चांदुरे, रवींद्र घावडे, गंगाधर खंडारे, चंद्रशेखर तिखे आदींनी पुढाकार घेतला, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख संजय बोरकर यांनी दिली.