लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शेतात फुललेल्या कपाशीच्या बोंडात शिरून संपूर्ण पीक उद्ध्वस्त करणाऱ्या बोंडअळीचा कपाशीवर यंदाही हल्ला होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागीलवर्षीचा कापूस जिनिंगमध्ये अद्याप पडून असल्याने या ठिकाणी बोंडअळीचे कोष तयार होत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून जिनिंगधारकांना अलर्ट करण्यात आले आहे. या विषयात उपाययोजना करण्याबाबत निर्देशही देण्यात आले आहेत.मागील वर्षी पिकायोग्य पाऊस झाल्याने कपाशीची चांगली वाढ झाली. मात्र कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीने हल्ला करून कपाशीचे पिक कुरतडून खाल्ले. परिणामी कापसाचे उत्पादन ५० टक्क्यापेक्षाही कमी झाले. एवढेच नव्हे तर गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या फवारणीनंतर अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली. त्यात अनेकांचे जीव गेले, तर अनेकांची प्रकृती गंभीर बनली. फवारणी करूनही बोंडअळीचा उपद्रव थांबला नाही. परिणामी मोठे नुकसान झाले. मागील वर्षीचा उद्रेक लक्षात घेता, यंदा ती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेतली आहे. मंगळवारी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयात यवतमाळात जिनिंगधारकांची बैैठक घेऊन बोंडअळीच्या प्रकोपावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैैठकीला वणी तालुक्यातील २१ जिनिंगधारक उपस्थित होते.बोंडअळीसाठी पोषक वातावरणसध्या पावसामुळे दमट वातावरण तयार झाले आहे. हे वातावरण कोष तयार होण्यासाठी पोषक आहे. जिनिंगमध्ये मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर कापूस साठविण्यात आला. त्यामुळे या अळीचे कोष संंबंधित जिनिंगमध्ये तयार होत आहेत. या कोषातून प्रथम पतंग तयार होतो. हा पतंग नंतर अंडी घालतो. त्यातून बोंडअळी तयार होते. त्यामुळे पतंगाला अटकाव घालण्यासाठी ‘फोरमॅन ट्रॅप’ (कामगंध सापळा) प्रत्येक जिनिंगमध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच शेतकऱ्यांनीहीदेखील आतापासूनच खबरदारी घेणे सुरू केले आहे. मागील वर्षी कपाशीचे उत्पन्न घेणाºया शेतकऱ्यांनी यावर्षी आतापासूनच शेतात ‘कामगंध’सापळे लावणे सुरू केले आहे.
जिनिंगमध्ये तयार होताहेत बोंडअळी कोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:48 PM
शेतात फुललेल्या कपाशीच्या बोंडात शिरून संपूर्ण पीक उद्ध्वस्त करणाऱ्या बोंडअळीचा कपाशीवर यंदाही हल्ला होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागीलवर्षीचा कापूस जिनिंगमध्ये अद्याप पडून असल्याने या ठिकाणी बोंडअळीचे कोष तयार होत आहेत.
ठळक मुद्देकृषी विभागाचा अलर्ट : उपाययोजना करण्याचे निर्देश, गतवर्षीचा कापूस शिल्लक