दुचाकीचा कट जीवावर बेतला, सख्ख्या भावांनी सूड उगवला
By admin | Published: March 12, 2017 12:55 AM2017-03-12T00:55:30+5:302017-03-12T00:55:30+5:30
ढाब्यावर जेवणासाठी जात असताना दुचाकीचा कट लागून वाद झाला. यात एकाने दुसऱ्याला मारहाण केली.
ढाब्यावर जेवणासाठी जात असताना दुचाकीचा कट लागून वाद झाला. यात एकाने दुसऱ्याला मारहाण केली. त्यानंतर हा वाद वाढतच गेला. मुलाला धोका आहे म्हणून कुटुंबीयांनी त्याला बाहेरगावी कामासाठी पाठवले. दोन दिवसासाठी घरी पाहुणपणाला आलेल्या अक्षयचा सुडाने पेटलेल्या बाक्सा व बोक्या या दोघांनी पाठलाग सुरू केला. घरापासून काही फूट अंतरावर असतानाच अक्षयवर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. यातच तो गतप्राण होवून कोसळला. सूड उगवणारे आता पोलीस कोठडीची हवा खात आहेत. यातील मृतक हा २२ वर्षाचा तर मारेकरी पंचविशीच्या आसपासचे आहेत. आयुष्याच्या सुरुवातीलाच तिघांवर कारागृहात जाण्याची वेळ आली.
\
एखादा वाद वेळीच निकालात काढला नाही तर किती भयानक रूप धारण करू शकतो, याचा प्रत्यय घाटंजीतील फोटोग्राफरच्या खुनातून येतो. या घटनेतील मृतक आणि मारेकरी हे चारही जण आपापल्या परीने व्यवसाय उद्योगात रमले होते. कामधंदा आटोपून रात्री ढाब्यावर जेवणासाठी जाताना किरकोळ कारणावरून वाद झाला. यातून दोघांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी मृतकाविरोधात मारहाणीचा गुन्हाही दाखल केला. मात्र त्यानंतरही आरोपींचे समाधान झाले नाही. काही करून मारहाणीचा बदला घ्यायचाच या सूडभावनेने यातील अक्षय ऊर्फ बक्सा संतोष मस्कर (२२) हा पेटून उठला.
मृतक अक्षय तुषार भोरे (२२) रा.प्रोफेसर कॉलनी हा घाटंजीत फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. मात्र १३ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान दुचाकीचा कट लागल्यावरून झालेल्या वादाने अक्षयचे जीवनच बदलून टाकले. काही क्षणाची घटना शेवटी अक्षयचा जीव घेवूनच शांत झाली. मारहाणीच्या घटनेनंतर अक्षयच्या कुटुंबीयांनी त्याला गावाबाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेपासून अक्षय अंबेजोगाई येथे खासगी ठेकेदाराकडे कामाला होता. तब्बल सहा महिन्यानंतर तो २४ फेब्रुवारी २०१७ रोजी घरी परत आला. दोन दिवसाच्या पाहुणपणासाठी घरी आल्यानंतर तो जुने वैमनस्य विसरून नेहमी प्रमाणे गावात फिरू लागला. रात्री ९.३० च्या सुमारास गावातून फिरून घराकडे येत असताना घरापासून अगदी काही फूट अंतरावर तिघांनी अक्षयवर हल्ला केला. यात अक्षयचा जागेवरच मृत्यू झाला. अक्षय भोरे याने केलेल्या मारहाणीचा वचपा घेण्यासाठी अक्षय ऊर्फ बक्स संतोष मस्क (२२), त्याचा मोठा भाऊ आकाश ऊर्फ बोका संतोष मस्कर, मित्र चेतन सुखदेव टेकाम तिघेही रा.घाटंजी यांनी कट रचला. घटनेच्या दिवशी दुपारपासूनच हे तिघेही दारूच्या नशेत होते. त्यांनी अक्षय भोरेवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. अक्षयला या हालचालीची साधी कुणकुणही लागली नाही.
सहा महिन्यापूर्वी झालेला वाद आता निवळला असेल असा समज करून अक्षय गावात वावरू लागला होता. दोन दिवसाच्या मुक्कामानंतर तो पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परत जाण्याच्या बेतात होता. मात्र त्याचा घरापासून काही अंतरावरच घात झाला. आरोपी बक्सा व बोका या दोघांनी अक्षयच्या डोक्यावर पाठीमागून लोखंडी रॉडने वार केले. तर चेतनने अक्षयला पकडून ठेवले. काही क्षणात झालेले जीवघेणे वार अक्षय सहन करू शकला नाही. त्याने जागेवरच प्राण सोडले. आरडाओरडा होताच परिसरातील मंडळी धावून आली. त्यांनी जखमी अक्षयला ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश भावसार यांनी सुरू केला. अवघ्या १२ तासातच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. घटनेनंतर आरोपी खापरी येथील हनुमान मंदिर परिसरात गेले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रॉड मंदिरामागे लपवून ठेवले. नंतर घाटंजीतीलच एका घराच्या छतावर त्यांनी आश्रय घेतला. पोलिसांनी पहाटे ४.४५ वाजता आरोपी बक्सा याला ताब्यात घेतले. त्यानंतर बोक्या व चेतनलाही पोलिसांनी जेरबंद केले. या तिघांनी गुन्ह्याची कबुली देत सूडातून खून केल्याचे सांगितले. या कारवाईत उपनिरीक्षक नीलेश उरकुडे, गणेश घोसे, उपनिरीक्षक पुप्पुलवार, डोंगरे, सुनील केवट, गणेश आगे, सुनील डुबे, रितेश श्रीवास, मोहन कन्नाके, सुरेश गेडाम आदींनी सहभाग घेतला.