ठळक मुद्देब्रिटिश काळात निरक्षर अंजनाबाई बनली यशस्वी व्यावसायिकनागपूरचे सावजी मटण, शेगावची कचोरी... तसा यवतमाळात ‘बुढीचा चिवडा’ फेमस! या खमंग चिवड्यासाठी अमेरिका, आॅस्ट्रेलियापर्यंत यवतमाळची खास ओळख निर्माण झाली आहे. कोणी केली ही कमाल? ही कमाल करणारा कोणी माई का लाल नव्हे खुद्द माईच आहे! या माईचा चिवडा आता सातासमुद्र
अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळच्या ‘चिवड्याचा ब्रँड’ जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या अंजनाबाई भुजाडे यांच्या कर्तृत्वाला जागतिक महिला दिनीच उजाळा देण्याचा हा प्रयत्न... ते वर्ष होते १९४६. ब्रिटिश राजवटीचा काळ. आलेगावचे (ता. बाभूळगाव) माहेर सोडून यवतमाळच्या भुजाडे परिवारात सासरी आलेली अंजनाबाई गरिबीशी दोन हात करू लागली. महिलांनी घराबाहेर पडू नये, डोईवरचा पदर ढळू नये, खालची मान वर करू नये... त्या काळात महिलांवर अशा बंधनांचे साखळदंडच होते. त्यातल्या त्यात आझाद मैदान म्हणजे जंगलव्याप्त परिसर. तेथे अंजनाबाई चिवड्याची हातगाडी लावून बसायची. केवळ १० पैशात चिवडा विकून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. प्रतिकूल परिस्थितीत ती स्वतंत्र व्यावसायिक बनली अन् यशस्वीही झाली.काळ बदलला पण अंजनाबाईच्या चिवड्याची चव कमी झाली नाही. यवतमाळकरांनी आत्यंतिक आपलेपणाच्या भावनेतून या चिवड्याला ‘बुढीचा चिवडा’ म्हणून लौकिक प्रदान केला. बुढी या शब्दामागे यवतमाळच्या माणसाला ‘माय’ हा अर्थही अभिप्रेत असतो. आज ७२ वर्षांच्या कालखंडानंतर हा चिवडा यवतमाळच्या खाद्यसंस्कृतीचा ‘ब्रँड’ बनला आहे. लग्न समारंभ, वाढदिव अशा प्रसंगात या चिवड्याला खास ‘आॅर्डर’ असते. बँक, शाळा, पोस्ट आॅफिस, जिल्हा परिषद, नगरपरिषद अशा कोणत्यातरी कार्यालयातून रोज ‘बुढीच्या चिवड्या’चे पार्सल हमखास मागविले जातेच. दररोज ३० पायल्या म्हणजे जवळपास ३५ किलो ‘बुढीच्या चिवड्या’ची उलाढाल होते.१९७७ मध्ये अंजनाबार्इंचा मृत्यू झाला. पण तिने यवतमाळला दिलेला चिवड्याचा ब्रँड आजही जगभरात जातोय. अंजनाबाईनंतर त्यांचा मुलगा श्रावण, त्यानंतर आता नातू अशोक ‘बुढीचा चिवडा’ विकतात. जेव्हा अंजनाबाईने आझाद मैदानात दुकान लावले, तेव्हा तेथे जंगल होते. आज ते मैदान जणू यवतमाळची चौपाटी बनली आहे. बुढी गेली पण बुढीचा चिवडा आज अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करतोय...
अमेरिका, दुबईतही पोहचला चिवडायवतमाळातील अनेकांचे नातेवाईक अमेरिका, दुबई, आॅस्ट्रेलिया, गोवा, कर्नाटक, गुजरात अशा विविध ठिकाणी आहेत. ते यवतमाळात आले की पार्सलच्या पार्सल भरून ‘बुढीचा चिवडा’ घेऊन जातात. अनेकदा तर फोन करून खास पार्सल मागवून घेतात, असे अंजनाबाईचे नातू अशोक भुजाडे सांगतात.