चर्मकार समाजबांधव कचेरीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:43 PM2018-09-14T22:43:49+5:302018-09-14T22:44:09+5:30
राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केलेल्या आवाहनानुसार विविध मागण्यांना घेऊन चर्मकार समाजबांधव शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धडकले. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केलेल्या आवाहनानुसार विविध मागण्यांना घेऊन चर्मकार समाजबांधव शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धडकले. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, रविदास महाराज जयंती दिनी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे सर्व कर्ज माफ करून या महामंडळाला नवीन भागभांडवल उपलब्ध करून द्यावे, समाजाच्या उन्नतीसाठी चर्मकार आयोग स्थापन करावा, विविध जिल्ह्यात चर्मकार समाजावर झालेल्या अन्याय-अत्याचाराची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शासन करावे, पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे, सरस्वतीबाई बनसोडे (पानभोसी, जि.नांदेड), सविता संतराम सोनवणे (संख, जि.सांगली) यांच्या खुनाची सीबीआय चौकशी करावी आदी मागण्या केल्या आहेत.
निवेदन देताना राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. हरिश पाचकोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. देवानंद तांडेकर, खुशाल डवरे, जिल्हाध्यक्ष नरेश खडतरे, पुरण तांडेकर, जिल्हा युवाध्यक्ष रवी बच्छराज, उपाध्यक्ष परशुराम मराठे, खुशाल मराठे, धर्मेंद्र बच्छराज, कमल झाडे, सागर मुराब आदी उपस्थित होते.