लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील उकणी कोळसा खाणीत शनिवारी रात्री कोळसा तस्करांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. या तस्करांनी खाणीत तैैनात सुरक्षा रक्षकांना मारहाण करीत आठ ते दहा पिक-अप वाहनातून कोळसा लंपास केला. या घटनेने वेकोलिच्या वर्तुळात खळबळ उडाली असून या घटनेनंतर रविवारी संतप्त कामगारांनी तब्बल चार तास काम बंद आंदोलन केले. पोलिसांच्या आश्वासनानंतर या कामगारांनी आंदोलन मागे घेतले.अवैध कोल माफियांनी वणी तालुक्यातील मुंगोली, कोलार पिंपरी, पिंपळगाव कोळसा खाणीतून गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर कोळसा लंपास केला. त्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. त्यातूनच तीन वर्षापूर्वी कोलमाफियांमध्ये टोळी युद्ध होऊन मुंगोली परिसरात मोठे गुन्हेसुद्धा घडले आहेत. हे कोलमाफिया ब्राम्हणी, कोलारपिंपरी परिसरात सक्रीय आहेत. अवैधरित्या कोळशाची तस्करी करणाºया या माफियांचे अनेक गट असून त्यांच्यात परिसराची वाटणी झाल्याची चर्चा आहे. रात्रीच्यावेळी कोळशाने भरलेले ट्रक थांबवून त्यातील कोळसा चोरून पिक-अप वाहनाने तो कोळसा लंपास करण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने या कोळसा माफियांची हिम्मत वाढली आणि त्यातूनच शनिवारी रात्री उकणी कोळसा खाणीत शिरून सुरक्षा रक्षकांना मारहाण करीत कोळसा लंपास करण्याची घटना घडल्याचे सांगण्यात येते. शनिवारी रात्री १० वाजता उकणी कोळसा खाणीमध्ये चार ते पाच युवक शिरले. त्यांनी उकणी खाणीतील सीसीटीव्ही प्रमुख राजेश नार्थन यांना धमकावून नऊ नंबरच्या कोळसा स्टॉकमधून पाच ते सहा वाहने भरून कोळसा काढला. या प्रकाराची माहिती सुरक्षा रक्षक विशाल गौतम कोल्हे याला मिळताच, त्याने चेकपोस्टकडे धाव घेतली. तेव्हा तेथून एक पिक-अप वाहन जाताना दिसले. गौैतमने सदर वाहनाला अडवून वाहनातील इरफान ईकबाल शेख (३२) याला विचारणा केली असता ईकबालने त्याच्याशी हुज्जत घालून त्याला धक्काबुक्की केली. तसेच पिक-अप वाहनातील हाफीज उर्फ टाफू अब्दूल सत्तार व गणेश तुकाराम चहारे यांनी गौैतमला शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गौैतमने रविवारी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीववून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.दरम्यान, घटनेनंतर रविवारी उकणी खाणीतील कामगारांनी कोळसा खाण बंद पाडली. यापूर्वी कोळसा खाणीतून कोळसा चोरीचा प्रकार होत नव्हता. परंतु येथील सुरक्षा यंत्रणा ‘अशक्त’ असल्याने कर्मचाºयांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने इंटकचे एरिया अध्यक्ष विनोद सिंग यांच्या नेतृत्वात पाच कोळसा कामगार संघटनांनी संप पुकारला होता. घटनास्थळावर सबएरिया मॅनेजर देशपांडे, राजेंद्र कुमार यांनी कामगारांशी चर्चा केली. त्यानंतर वेकोलिच्या अधिकाºयांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना भेटून चोरीच्या घटनेवर अंकुश लावण्याची मागणी केली. पोलिसांकडून आश्वासन मिळाल्यानंतर कामगारांनी चार तास बंद ठेवलेली खाण पुन्हा सुरू केली.
उकणी खाणीत कोलमाफियांचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 12:56 AM