जिल्हा परिषदेवर काँग्रेस-भाजपा-राकाँची सत्ता

By Admin | Published: March 22, 2017 12:08 AM2017-03-22T00:08:28+5:302017-03-22T00:08:28+5:30

जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी व अपक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली.

Congress-BJP-Rakanchi rule on Zilla Parishad | जिल्हा परिषदेवर काँग्रेस-भाजपा-राकाँची सत्ता

जिल्हा परिषदेवर काँग्रेस-भाजपा-राकाँची सत्ता

googlenewsNext

शिवसेना विरोधी बाकावर : अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी आडे, उपाध्यक्षपद भाजपाकडे
यवतमाळ : जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी व अपक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी अनिल आडे तर उपाध्यक्षपदी भाजपाचे श्याम जयस्वाल विजयी झाले. त्यांना प्रत्येकी ४१ मते मिळाली. २० मते मिळाल्याने शिवसेनेच्या कालिंदा पवार व विजय राठोड हे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले.
६१ सदस्यीय यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक २० जागा शिवसेनेने पटकाविल्या. भाजपा १८, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी ११ तर अपक्षाकडे एक जागा आहे. सत्तेचे गणित बसविण्यासाठी किमान ३१ जागांची गरज होती. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या मदतीने हा जादुई आकडा गाठण्याचे निश्चित केले होते. तशी घोषणाही शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोमवारी सायंकाळी संयुक्त पत्रपरिषदेत केली होती. परंतु मंगळवारी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने शिवसेनेची साथ सोडून अचानक कमळ हाती घेतल्याने सेनेचे सत्तेचे गणित फिस्कटले. शिवसेनेला सत्तेचा लाभ मिळू नये हे एकमेव टार्गेट भाजपाने ठेवले होते. त्यासाठी भाजपाने चक्क ११ सदस्य असलेल्या काँग्रेसला अध्यक्षपदाची आॅफर दिली. सोबतीला राष्ट्रवादीलाही घेतले आणि सत्ता स्थापन केली.
जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी गेल्या दोन दिवसांपासून राजकीय खलबते सुरू होती. काल रात्रीपासून अचानक वेगवान हालचाली झाल्या. पहाटेपर्यंत प्रमुख चारही राजकीय पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फेरी झाल्या. प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षातील काही उमेदवार फोडल्याचा दावा करीत होता. ३० सदस्य सोबत पर्यटनाला गेल्याने धोका होणार नाही, असे मानून शिवसेना काहीशी निश्चिंत होती. मात्र बेसावध राहण्याचा फटका सेनेला बसला. सेनेसोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीला आपल्याकडे खेचून आणण्यात भाजपाने यश मिळविले. सेनेकडून राष्ट्रवादीवर आता दगाफटका केल्याचा आरोप होत आहे. हा दगाफटका करुनही राष्ट्रवादीला मात्र एखाद दोन सभापतीपदावरच समाधान मानावे लागणार आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे ३० सदस्य चार दिवसांपूर्वीच हैदराबादला गेले होते. तेथून ते मंगळवारी परतले. नामांकन दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिवसेनेसोबत जेवण घेतले. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सेनेची साथ सोडली. मंगळवारी ११ ते १ ही नामांकनाची वेळ होती. अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या माधुरी आडे व शिवसेनेच्या कालिंदा पवार यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसकडून डमी उमेदवार म्हणून वैशाली राठोड यांनीही नामांकन दाखल केले होते. उपाध्यक्ष पदासाठी भाजपासोबतच शिवसेनेचे विजय राठोड यांनी नामांकन दाखल केले. जिल्हा परिषद सभागृहामध्ये दुपारी ३ वाजता हात उंचावून मतदान झाले. त्यात काँग्रेस व भाजपाच्या अनुक्रमे अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या उमेदवाराला प्रत्येकी ४१ तर सेनेच्या उमेदवारांना २० मते मिळाली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी आडे विजयी झाल्या. भाजपाचा उपाध्यक्ष पदाचा उमेदवारही ४१ मते घेऊन निवडून आला. सभागृहाबाहेर भाजपा व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने उभे ठाकले होते. त्यांनी तेथे प्रचंड घोषणाबाजी केली. ते पाहता राडा होतो की काय अशी हूूरहूर उपस्थितांमध्ये ऐकायला मिळत होती. परंतु नंतर तणाव निवळला. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच पहायला मिळाली. अखेर त्यात माजी मंत्री अ‍ॅड. मोघे यांनी यश मिळविले.
वणी विभागातून खंडाळकरांचे नाव
काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार व शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांनी पक्षात अनुभवी अरुणा खंडाळकर यांचे नाव रेटले. त्या अनेक वर्ष पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातही वारसा आहे.
माणिकरावांचा आग्रह स्वाती येंडेसाठी
विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आर्णी तालुक्यातून निवडून आलेल्या स्वाती येंडे यांचे नाव अध्यक्षपदासाठी रेटले होते. अखेरपर्यंत त्यांनी या नावाचाच आग्रह धरला. या निमित्ताने मराठा समाजाला खूश करुन लालदिवा आर्णी मतदारसंघात नेल्यास अ‍ॅड. मोघे आणि काँग्रेसला त्याचा निवडणुकीत राजकीय फायदा होईल, असे गणित मांडण्यात आले होते.
काँग्रेस निष्ठावंतांचा वेगळा सूर
भाजपाशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसमधील निष्ठावंतांमध्ये मात्र नाराजी दिसून येते. काँग्रेसने जातीयवादी पक्षाशी युती करून आपल्या धर्मनिरपेक्ष भूमिकेशी फारकत घेतल्याचा निष्ठावंतांचा सूर आहे. विरोधी पक्षात बसावे लागले असते तरी चालले असते, परंतु भाजपाशी युती करायला नको होती, आता आम्ही मतदारांमध्ये कोणत्या तोंडाने जावे, असा काँग्रेसमधील या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सवाल आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

‘काँग्रेसमुक्त भारता’च्या भाजपाच्या अजेंड्याला हरताळ

४केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला आहे. तोच भाजपाचा राष्ट्रीय अजेंडा आहे. विविध राज्यांच्या निवडणुकीतही त्या दृष्टीने राजकीय प्रयत्न भाजपाकडून केले जात आहे. काँग्रेसला कायम सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असताना यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत खुद्द भाजपानेच ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या

Web Title: Congress-BJP-Rakanchi rule on Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.