तिसऱ्या ‘एन्ट्री’वर काँग्रेस नेत्यांचे दिग्रसमध्ये ‘चिंतन’

By admin | Published: December 31, 2016 01:05 AM2016-12-31T01:05:14+5:302016-12-31T01:05:14+5:30

जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाच्या शर्यतीत ऐनवेळी मुंबईत तिसऱ्याच्या नावाची ‘एन्ट्री’ झाल्याने काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे राजकीय गणितच विस्कटले आहे.

Congress' leaders' chintan 'on third entry | तिसऱ्या ‘एन्ट्री’वर काँग्रेस नेत्यांचे दिग्रसमध्ये ‘चिंतन’

तिसऱ्या ‘एन्ट्री’वर काँग्रेस नेत्यांचे दिग्रसमध्ये ‘चिंतन’

Next

जिल्हाध्यक्ष निवडणूक : नेत्यांच्या गटबाजीने कार्यकर्ते सैरभैर
यवतमाळ : जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाच्या शर्यतीत ऐनवेळी मुंबईत तिसऱ्याच्या नावाची ‘एन्ट्री’ झाल्याने काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे राजकीय गणितच विस्कटले आहे. या तिसऱ्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास परिस्थिती कशी हाताळायची यावर चिंतन करण्यासाठी दिग्रसमध्ये काँग्रेस नेत्यांची शुक्रवारी बैठक बोलाविण्यात आली होती. वृत्तलिहिस्तोवर ही बैठक सुरू होती.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीचा वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. वामनराव कासावार यांचा राजीनामा आणि नव्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी मुंबई-दिल्लीत येरझारा मारणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या गटाने जिल्ह्यातून दोन माजी मंत्र्यांची नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविली होती. मात्र त्यानंतरही प्रदेशकडून जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय दिला जात नव्हता. म्हणून जिल्ह्यातून कुणीही अध्यक्ष करा, मात्र तत्काळ निर्णय द्या, अशी भूमिका या नेत्यांनी घेतली होती. या दोन माजी मंत्र्यांमधूनच एकाची निवड होईल, असे वाटत असताना गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीत अचानक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष उत्तमराव पाटील यांचे नाव पुढे केले गेले. पाटील घराण्याचे काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेत्यांवर कमी-अधिक प्रमाणात राजकीय उपकार आहेत. त्यामुळे मनीष पाटलांच्या नावाला विरोध करायचा कसा असा प्रश्न या नेत्यांपुढे निर्माण झाला. मनीष पाटील यांच्या नावामुळे या सर्व नेत्यांची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे. विरोधही करता येत नाही आणि होकारही देता येत नाही, अशी स्थिती आहे. मनीष पाटील यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी निश्चित मानले जात आहे. त्यांचे नाव पुढे येताच स्पर्धेतील अन्य दोघांनी जणू शस्त्रे खाली टाकल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पाटील यांच्या नावाची लवकरच घोषणा होण्याची शक्यताही काँग्रेसच्या गोटात वर्तविली जात आहे. दरम्यान मनीष पाटलांचे नाव पुढे करून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सर्वांचीच कोंडी केल्याने जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते नाराज आहेत.
याच अनुषंगाने शुक्रवारी दिग्रसमध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्याकडे या काही नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती आहे. त्यात नेमकी काय चर्चा झाली हे मात्र कळू शकले नाही. सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक सुरूच होती. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)

नेत्यांना पदाची लालसा सुटेना
वर्षानुवर्षे आमदार-मंत्री पदे उपभोगलेल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना आता जिल्हाध्यक्ष पदाची लालसा कशासाठी असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर चक्क ज्येष्ठ नेत्यांमधीलच अंतर्गत वाद उफाळून आल्याने पक्षाचे निष्ठावंत सामान्य कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले आहे. अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तर भाजपा-शिवसेना या पक्षांचीही चाचपणी सुरू केल्याचे दिसून येते. निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर काँग्रेसचा हा पोळा फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

Web Title: Congress' leaders' chintan 'on third entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.