संविधान हे प्रत्येकाच्या कल्याणासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:12+5:30
प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार म्हणाले, स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. संविधानाविषयीच्या अनेक बाबी या ग्रंथात समाविष्ट असल्याने त्याला मिनी संविधान म्हटले जायचे. सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध असलेल्या मसुद्यावर अनेकदा निर्णय घेणे सोपे गेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपला देश एकसंघ राहावा, तो कधीही तोडला जाऊ नये यासाठी सुमारे ३०० लोकप्रतिनिधींच्या साक्षीने भारताचे संविधान तयार करण्यात आले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी संविधान अत्यंत उपयुक्त आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व हे संविधानाचे मुलभूत तत्त्व आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार यांनी केले.
येथील आझाद मैदानात आयोजित स्मृती पर्वात प्रज्ञा-शील-प्रतिभा संवैधानिक लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान यांच्या संयोजनात आयोजित व्याख्यानात त्यांनी आपले विचार मांडले. ‘भारतीय संविधानाची मुलभूत संरचना : सांसद आणि सर्वोच्च न्यायालय’ असा व्याख्यानाचा विषय होता.
प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार म्हणाले, स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. संविधानाविषयीच्या अनेक बाबी या ग्रंथात समाविष्ट असल्याने त्याला मिनी संविधान म्हटले जायचे. सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध असलेल्या मसुद्यावर अनेकदा निर्णय घेणे सोपे गेले आहे. आरक्षणाच्या बाबतीत घटनेमध्ये कुठेही मर्यादा विषद केली नसली तरी, सर्वोच्च न्यायालयाला हे माहीत होते की, समानतेच्या मुलभूत तत्त्वाला बाधा येईल असे अमर्याद आरक्षण देता येणार नाही. हा निष्कर्ष स्टेट्स अँड मायनॉरिटीज यातून लावण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
सरकारी उद्योगांचे खासगीकरण, आरक्षणाला आव्हान देणे, मुस्लीमांचे तुष्टीकरण, न्यायपालिकेत सरकारी हस्तक्षेप, लोकशाही मूल्ये जोपासणाऱ्या संस्था मोडीत काढणे, शिक्षण क्षेत्रात भांडवलदारांना प्रवेश, शिक्षणाचे ब्राह्मणीकरण आदी बाबी संविधानाला धोका पोहोचविणाºया असून लोकशाहीला मारक आहेत. त्या वेळीच थांबविणे काळाची गरज आहे, असे प्रा. घोडेस्वार म्हणाले.
यावेळी रवी मानव यांचेही भाषण झाले. मंचावर प्रमोद अजमिरे, प्रवीण मोरे, वैशाली फुसे, धम्मा कांबळे, अंकुश वाकडे, नामदेव थूल, अॅड. सोपान कांबळे आदी उपस्थित होते. समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, कवडुजी नगराळे, विलास काळे, जनार्दन मनवर, विष्णू भितकर, रवी श्रीरामे, के.एस. नाईक आदींचीही उपस्थिती होती.
आजचे व्याख्यान
स्मृती पर्व महिला समिती ‘वुमेन्स विंग्ज ऑफ आंबेडकराईट्स मुव्हमेंट’ यांच्या संयोजनात ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होणार आहे. अतुल खोब्रागडे प्रमुख वक्ते आहे. ‘लोकशाही पायदळी तुडविली जात आहे, कारणीभूत कोण? आपणच !’ असा व्याख्यानाचा विषय आहे.