धक्कादायक! कंत्राटी वायरमनचा खांबावरच कोळसा, शिरसगावात तणाव
By विलास गावंडे | Published: October 13, 2023 06:03 PM2023-10-13T18:03:13+5:302023-10-13T18:04:25+5:30
वीज ऑपरेटरला मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा
नेर (यवतमाळ) : वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी वायरमनचा शॉक लागून मृत्यू झाला. त्याचा खांबावरच अक्षरश: कोळसा झाला होता. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शिरसगाव पांढरी शेतशिवारात घडलेल्या या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला. विद्युत केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. जनक्षोभ पाहता नेर पोलिसांनी वीज ऑपरेटरसह तीन जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
खरडगाव (ता.नेर) येथील पंकज दुर्योधन करडे (२५) हा विद्युत कंपनीत मागील चार वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. शिरजगाव पांढरी शिवारात लाईनमध्ये बिघाड झाल्याने तो शुक्रवारी सकाळी ८ वाजता शिरजगाव येथील पाॅवर हाउसमध्ये आला. वीज पुरवठा बंद करून रजिस्टरमध्ये नोंद टाकली. ऑपरेटर गजानन रमाकांत चक्करवार (४७) यांना सांगून वीज दुरुस्तीसाठी निघून गेला.
बिघाड असलेली लाईन दुरुस्त करण्याकरिता पंकज खांबावर चढला. याठिकाणी त्याचा भाऊ भावेश हा देखील उपस्थित होता. त्याचवेळी विद्युत पुरवठा सुरू झाल्याने शॉक लागून पंकजचा खांबावरच मृत्यू झाला. तेथेच त्याचा कोळसा झाला. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दी झाली. ऑपरेटर गजानन चक्करवार याला संतप्त जमावाने मारहाण केली. पोलिसांनी त्याची जमावाच्या तावडीतून मुक्तता केली.
ऑपरेटर व इतर तिघांनी वीजपुरवठा सुरू केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. गजानन चक्करवार, भूषण वीर, विकी कांबळे, मुकुंद गावंडे यांना अटक झाल्याशिवाय पंकजचा मृतदेह खांबावरून उतरवून देणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली. त्यामुळे ऑपरेटरसह तीन जणांना लगेच ताब्यात घेण्यात आले. एक जण पसार झाला आहे. या चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब नाईक यांनी अतिरिक्त कुमक मागविली होती.
मृतदेह वीज कार्यालयावर
पंकज करडे याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी नेर येथे आणण्यात आला. तत्पूर्वी विद्युत कंपनीच्या कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ऑपरेटरसह चार जणांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. यानंतर ऑपरेटर गजानन चक्करवारसह भूषण वीर, विकी कांबळे, मुकुंद गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना अटक करण्यात आली असून, विकी कांबळे पसार झाला आहे.