लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने आणखी तिघांचा बळी घेतला आहे. यातील दोन जण यवतमाळातील तर एक जण पुसदमधील आहे. शुक्रवारी कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६७ व ७६ वर्षीय दोन महिला आणि पुसद शहरातील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शुक्रवारी ४० नव्या कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर ५२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या २६५ अक्टीव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण आहेत. मृतांचा आकडा ३६२ वर पोहोचला आहे. आतापर्यंंतच्या एकूण पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या दहा हजार ९६१ एवढी नोंदविली गेली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार शुक्रवारी ९५९ रिपोर्ट प्राप्त झाले. त्यापैकी ४० पाॅझिटीव्ह तर ९१९ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दहा हजार २७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अद्यापही ८९९ संशयितांचे नमुने अप्राप्त आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या वाढत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सर्वांनाच भीती कोरोनाची दुसरी लाट देशाबाहेर सुरू झाली आहे, देशातही रुग्ण वाढत आहे. त्यातच हिवाळा कोरोनाला पोषक आहे, असे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये या दुसऱ्या लाटेबाबत भीतीचे वातावरण पहायला मिळते. प्रशासनही त्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, खबरदारी व तयारी करीत आहे. दुसऱ्या लाॅकडाऊनची लागली सर्वत्र हुरहूर कोरोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी पुन्हा लाॅकडाऊन होणार असल्याची चर्चा आहे. या दुसऱ्या लाॅकडाऊनमुळे सर्वच दहशतीत आहे. हा लाॅकडाऊन झाल्यास अर्थव्यवस्था आणखी कोलमडेल अशी भीती समाजातील सर्वच घटकात पहायला मिळते.