कवडीमोल आयुष्याभोवती दोस्तांचा काफिला
By Admin | Published: March 29, 2017 12:25 AM2017-03-29T00:25:16+5:302017-03-29T00:25:16+5:30
नातेवाईकांनी नाकारलेला, समाजाने झिडकारलेला आणि वैद्यकीय यंत्रणेनेही अव्हेरलेला पांढरकवड्याचा ७५ वर्षांचा ‘कवडू’ अखेर वृद्धाश्रमात पोहोचला.
डोंगरेंचा आधार : पांढरकवड्याच्या रस्त्यावरचा ‘कवडू’ अखेर वृद्धाश्रमात
यवतमाळ : नातेवाईकांनी नाकारलेला, समाजाने झिडकारलेला आणि वैद्यकीय यंत्रणेनेही अव्हेरलेला पांढरकवड्याचा ७५ वर्षांचा ‘कवडू’ अखेर वृद्धाश्रमात पोहोचला. तिथे आपल्यासारखेच ‘लेकरांनी’ नाकारलेले वृद्ध सोबती मिळाल्याने शारीरिक वेदना सोसण्याची ताकद कवडूला मिळाली आहे.
‘लोकमत’ने ७ मार्च रोजी कवडूची कडवट कहाणी प्रकाशित केली होती. ‘बाईचं काळीज... परक्या वृद्धालाही देते बापाची माया’ हे वृत्त प्रकाशित होताच समाज मदतीसाठी सरसावला. पण ज्या वैद्यकीय उपचारांची खरी गरज होती, ती शक्य झाली नाही. पांढरकवड्यातील माया मडावी, दुर्गा मडावी, नम्रता मडावी, हरीप्रसाद शर्मा यांनी या वृद्धाला यवतमाळात आणले. एका खासगी डॉक्टरने आधी उपचार करतो असा शब्द दिला. मात्र नंतर हा कवडूला शासकीय रूग्णालयात पाठवून दिले. तिथेही पहिला दिवस चांगला गेला. नंतर उपचार थांबवून या पेशंटला परत घेऊन जा, अशा धोशा लावण्यात आला. अखेर २६ मार्चला कवडूला शेषराव डोंगरे यांच्या वृद्धाश्रमात पोहोचविण्यात आले. तेथे पोहोचता क्षणी तेथील वृद्धांचा कवडू भोवती गोतावळा जमला. (स्थानिक प्रतिनिधी)