बंदी भागात मरणयातना
By admin | Published: July 16, 2014 12:29 AM2014-07-16T00:29:52+5:302014-07-16T00:29:52+5:30
पैनगंगा अभयारण्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील गावांना पावसाळा आला की मरणयातना सोसाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर या भागातील रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही
रस्ते नादुरुस्त : पावसाळ्यात तुटतो गावांचा संपर्क
अविनाश खंदारे ल्ल उमरखेड (कुपटी)
पैनगंगा अभयारण्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील गावांना पावसाळा आला की मरणयातना सोसाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर या भागातील रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पूलही खिळखिळे झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. सार्वजनिक बांधकाम विभाग अभयारण्याच्या नियमांचे कारण पुढे करून दुरुस्तीत टाळाटाळ करीत आहे.
उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीतिरावर पैनगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात ६० किलोमीटर चौरस परिसरात पसरलेल्या भागाला बंदी भाग म्हणून ओळखले जाते. जवराळा, थेरडी, डोंगरगाव, सोनदाभी, गाडी, बोरी, खरबीसह अनेक गावे आहे. या गावांना जोडण्यासाठी कधीकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते केले होते. मात्र दुरुस्तीचे नावच कुणी घेत नाही. २० वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग अभयारण्याच्या जाचक कायद्याचे कारण पुढे करते. उमरखेड ते किनवट जाणारा रस्ता जेवलीपासून किनवटपर्यंत पूर्णत: उखडला आहे. या रस्त्यावर दुरुस्ती केली जात नाही. आणि नवीन रस्त्यासाठी प्रस्ताव तयार होत नाही. हा रस्ता पैनगंगा अभयारण्यातील गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून किनवट अथवा उमरखेड आणि पुढे जावे लागते. रस्ता नादुरुस्त असल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागतात. गेल्या २० वर्षांपासून नागरिक रस्त्यासाठी लढा देत आहे. जेवली ते किनवट या रस्त्यावर जनावरांनाही चालता येत नाही. वाहन कसे जात असेल, हे त्या चालकांनाच माहीत. या मार्गावरील पूल जीर्ण होऊन खचले आहेत. काही पूल गाळ अडकल्याने जमिनीबरोबर आले आहेत. अशा स्थितीतही नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. पावसाळ्यात नाल्याला पूर आला तरी तासनतास वाहतूक ठप्प होते. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी जातात. त्यांनाही या रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो.