गर्भवतीच्या मृत्यूने ‘प्रसव’ला हद्दीचा वाद
By admin | Published: January 22, 2015 02:13 AM2015-01-22T02:13:41+5:302015-01-22T02:13:41+5:30
आरोग्य शिबिरात उपचारार्थ दाखल असताना प्रकृती अत्यवस्थ होऊन एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.
प्रवीण पिन्नमवार पांढरकवडा
आरोग्य शिबिरात उपचारार्थ दाखल असताना प्रकृती अत्यवस्थ होऊन एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेनंतर तिच्या पतीने डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा प्रकार घडल्याचा आरोप करीत पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न चालविला. मात्र तीनही पोलीस ठाण्यांनी हद्दीचा वाद पुढे करून तक्रार स्वीकारली नाही. आता नेमकी हद्द कुणाची हा तिढा कायम ठेवत चेंडू वणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे टोलविण्यात आला. या घटनेवरून पोलीस खरेच संवेदनहीन असल्याचा प्रत्यय येतो.
रजिता दिनेश सिडाम (१९) रा. निमनी ता. झरी असे मृत गर्भवतीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचा एक पाय दुखत होता. त्यामुळे १९ जानेवारीला तिला पती दिनेश सिडाम याने झरी येथील आरोग्य उपकेंद्रात आयोजित आरोग्य शिबिरात उपचारासाठी नेले. यावेळी तपासणी करून डॉक्टरांनी तिला उपचारार्थ दाखल करून घेतले. काही काळ औषधोपचार झाल्यानंतर सायंकाळी तिला अत्यवस्थ वाटू लागले. याची कल्पना डॉक्टरांना देण्यात आली. फेर तपासणी करून डॉक्टरांनी पुन्हा उपचार चालविले. मात्र रात्री तिची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे डॉक्टरांंनी तिला पुढील उपचारासाठी पांढरकवडा येथे हलविण्यास सांगितले. रुग्णवाहिकेतून पांढरकवडा येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर पती दिनेश याने पांढरकवडा पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने पत्नी रजिताचा मृत्यू झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र हद्दीचे कारण पुढे करून त्यांनी केवळ अकस्मात घटनेची नोंद केली. त्यामुळे झरी हे ठिकाण येत असलेले मुकुटबन पोलीस ठाणे गाठले. तेथील ठाणेदारांनी तिचा मृत्यू पांढरकवडा ठाण्याच्या हद्दीत झाला, असे कारण पुढे करून गुन्हा नोंदविण्याचे टाळले. त्यानंतर दिनेशने पाटण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेही हद्दीचेच कारण पुढे करण्यात आले. तेव्हा दिनेश आणि त्याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत नेमकी कुठली हद्द ते आपसात ठरवून घ्या आणि आमची तक्रार नोंदवा, असा पवित्रा घेतला. तेव्हा तीनही ठाण्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये हद्दीवरून तू-तू-मै-मै झाली. त्यामुळे अद्यापही हा तिढा सुटला नाही. शेवटी हद्द ठरविण्यासाठी वणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला रजिताच्या नातेवाईकांना देण्यात आला. गर्भवती असताना चक्क आरोग्य शिबिरातच कुणाचा मृत्यू व्हावा ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या घटनेचे वास्तव पुढे येणे गरजेचे आहे. गुन्ह्यांचा आलेख वाढू नये म्हणून या घटना दडपल्या जातात.