दोन युवकांच्या खुनाने जिल्हा हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 09:57 PM2019-08-06T21:57:50+5:302019-08-06T21:58:23+5:30
घरात झोपून असलेल्या लहान भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला. ही घटना परसोडी(खुर्द) ता.कळंब येथे मंगळवारी सकाळी घडली. बाभूळगाव तालुक्याच्या कापरा बेड्यावरील युवकाचा मृतदेह गळ्यावर, तोंडावर जखमा असलेल्या स्थितीत आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब/बाभूळगाव : घरात झोपून असलेल्या लहान भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला. ही घटना परसोडी(खुर्द) ता.कळंब येथे मंगळवारी सकाळी घडली. बाभूळगाव तालुक्याच्या कापरा बेड्यावरील युवकाचा मृतदेह गळ्यावर, तोंडावर जखमा असलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनांमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
परसोडी(खुर्द) येथील किरण रमेश दिघडे (२८) याला मानेवर कुºहाडीचे घाव घालून ठार मारण्यात आले. घरात खाटेवर झोपून असताना सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याचा मोठा भाऊ प्रवीण उर्फ बाल्या रमेश दिघडे याने खून केला. कौटुंबिक कलहातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. प्रकरणी पोलीस पाटील सुरेश भगत यांनी तक्रार नोंदविली. यावरून कळंब पोलिसांनी बाल्या दिघडे याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनोद जांभुळे करीत आहे.
बाभूळगाव तालुक्यात येत असलेल्या बेंबळा प्रकल्पाच्या गेटपासून ५० मीटर अंतरावरील मत्स्य बीज केंद्राजवळ पारधी समाजातील युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर, तोंडावर मोठ्या जखमा आढळल्या. त्याचा गळा चिरुन खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. नरेनसेठ बतावन पवार (३०) रा.कापरा पारधीबेडा असे मृताचे नाव आहे. तो सोमवारी घरून गेला होता. मंगळवारी सकाळी ६ वाजता मत्स्य बीज केंद्राजवळ त्याचा मृतदेह आढळला. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून कापरा येथे नेला. याची माहिती पोलीस पाटील यांना मिळाली. त्यांनी मृतदेह बाभूळगाव येथे हलविण्यास सांगितले. यवतमाळ ग्रामीण व बाभूळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. नरेनसेठचा भाऊ नरेंद्रसिंग बतावन पवार याने घटनेची तक्रार पोलिसात दिली. या प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदविला.
बेंबळा धरणाजवळ दोघांवर हल्ला
बाभूळगाव : बेंबळा धरणाजवळ दोघांवर एका समाजातील १५ ते २० लोकांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. रमेश बापूराव वाघाडे (५५) रा.कोपरा(जानकर) व देवानंद कोडापे (४०) रा.खडकसावंगा अशी जखमींची नावे आहेत. रमेश वाघाडे हे बेंबळा प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे काम करतात. यासाठी दुचाकीने जात असताना एका समाजातील लोकांनी त्यांना अडविले. त्याचवेळी या परिसरात गुरे चारत असलेल्या देवानंद कोडापे याच्यावरही हल्ला केला. वाघाडे यांचा मोबाईल व रक्कम पळविली, तर त्यांची दुचाकी दगडाने फोडून टाकण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.