जिल्हा शिवसेनेमध्ये असंतोष धुमसतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 09:49 PM2018-02-21T21:49:42+5:302018-02-21T21:51:02+5:30
जिल्हा शिवसेना नेत्यांमधील वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. जिल्हा प्रमुख पदावरील नियुक्त्यांनंतर हा वाद मिटेल, असा अंदाज होता.
राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा शिवसेना नेत्यांमधील वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. जिल्हा प्रमुख पदावरील नियुक्त्यांनंतर हा वाद मिटेल, असा अंदाज होता. परंतु प्रत्यक्षात या नियुक्त्यानंतर हा वाद आणखी पेटल्याचे व त्यातूनच दोन्ही नेत्यांच्या गटात एकमेकांविरुद्ध असंतोष धुमसत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
जिल्हा प्रमुखाच्या नियुक्त्यांवरून खासदार भावना गवळी आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड या दोन सेना नेत्यांमध्ये वाद रंगला आहे. ‘मातोश्री’पर्यंत जाऊनही या वादावर सर्वसमावेशक तोडगा निघू शकलेला नाही. या वादावर उतारा म्हणून ‘मातोश्री’ने तीन जिल्हा प्रमुखांचा प्रस्ताव मान्य केला. त्यानुसार विश्वास नांदेकर यांना कायम ठेऊन पराग पिंगळे व राजेंद्र गायकवाड यांना संधी देण्यात आली. पिंगळे यांच्या जिल्हा प्रमुख पदाची यापूर्वीच घोषणा झाली होती. मात्र त्यावर भावनातार्इंनी स्थगनादेश मिळविला होता. पिंगळे यांच्या नावाला आपला विरोध नसल्याचे भावनातार्इंनी अनेकदा सांगितले. नव्या नियुक्त्यांमध्ये पिंगळे यांना सामावून घेत गायकवाड यांनाही संधी दिल्याचे व वाद मिटविल्याचे दाखविले जात असले तरी ही वरवरची स्थिती आहे. प्रत्यक्षात वाद आणखी पेटला आहे.
पिंगळेंना केवळ उमरखेडात वाव
तिसऱ्या जिल्हा प्रमुखाचा प्रस्ताव मान्य करून घेऊन त्या पदावर आपल्या यादीतील राजेंद्र गायकवाड यांची वर्णी लावली गेल्याने नेत्यांच्या या लढाईत भावनाताई गवळी यांची सरशी झाल्याचे राजकीय गोटात मानले जाते. त्यांनी जणू नांदेकर आणि पिंगळेंना आपल्या लोकसभा मतदारसंघाबाहेर काढले. संजय राठोड यांनी आधीच नियुक्ती दिलेल्या पराग पिंगळे यांना जिल्हा प्रमुखपदी कायम ठेवले गेले असले तरी त्यांच्याकडील यवतमाळ शहर ही महत्वपूर्ण जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे शिवसेनेचे आधीच वर्चस्व असलेल्या व तेथे काम करण्याची फारशी संधी नसलेल्या ना. संजय राठोड यांच्या दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. याशिवाय भाजपाच्या ताब्यातील उमरखेड या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघाची धुरा पिंगळे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तेथे २०१९ मध्ये भाजपाला विधानसभेत चीत करण्यासाठी पिंगळे यांना ‘प्लॅनिंग’ करण्याला वाव आहे.
तार्इंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
भावनातार्इंच्या बहुतांश सोईने तीन जिल्हा प्रमुखांच्या नावाची घोषणा होताच यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावनाताई याच शिवसेनेच्या उमेदवार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. कारण ‘मातोश्री’ने त्यांच्या सोईने जिल्हा प्रमुख दिले आहेत. लोकसभा लढण्याबाबत ना. संजय राठोड यांच्यापुढेही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांनी तो स्पष्टपणे नाकारला. तर भावनातार्इंनी ‘माझ्या सोईने नियुक्त्या होत नसेल तर लोकसभा लढणार नाही’ अशी भूमिका मांडली. दिग्रस-दारव्हा स्ट्राँग आहे, मात्र अन्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना वाढीला खूप वाव असल्याचे तार्इंनी यावेळी सांगितले. अखेर त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली.
भाजपातील ‘त्या’ उमेदवाराचीही चाचपणी
शिवसेनेने आणीबाणीत पर्यायी उमेदवार म्हणून भाजपाच्या लोकसभा मतदारसंघाच्या वाटेवरील चर्चित नेत्यालाही गळाला लावण्याची तयारी ठेवली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतील दुखावलेल्या बंजारा समाजाने भाजपातील ‘त्या’ उमेदवाराला पसंती दिल्यास शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारापुढे प्रचंड अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ना. संजय राठोड व खासदार भावनाताई गवळी यांच्या या राजकीय भांडणात भाजपा अथवा काँग्रेस आणि त्यातही बंजारा समाजाच्या उमेदवाराचा फायदा होण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे.
मावळत्या शहर प्रमुखांनी बोलावली बैठक
यवतमाळ शहर सेनेचे मावळते प्रमुख आणि नवनियुक्त जिल्हा प्रमुख (दिग्रस, उमरखेड विधानसभा) पराग पिंगळे यांनी शुक्रवारी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलविल्याची माहिती आहे. शहर प्रमुख पद काढून घेतल्याने त्यांची नाराजी आहे. ते या मुद्यावरून टोकाची भूमिका तर घेणार नाहीत ना ? असा शंकेचा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळतो आहे. तर येथील दुसरा गट ‘आम्हाला त्याची पर्वा नाही’ अशा रोखठोक भूमिकेत दिसतो आहे.
नवा पॅटर्न लागला संजय राठोडांच्या जिव्हारी
मुळात पिंगळे यांच्या नियुक्तीवर भावनातार्इंनी आणलेला स्थगनादेश आणि तीन जिल्हा प्रमुखांचा पॅटर्न ना. संजय राठोड यांच्या जिव्हारी लागला आहे. जिल्हा प्रमुख पदांचा विचार करता भावनातार्इंची सरशी झाल्याचे दिसत असले तरी ना. राठोडांच्या या नाराजीचा मोठा फटका ‘सामाजिक’दृष्ट्या लोकसभा निवडणुकीत भावनातार्इंना बसण्याची शक्यता सेनेतूनच वर्तविली जात आहे. आपल्या नेत्याला दुखविल्याने शिवसेनेशी बांधिलकी ठेवणारे बंजारा समाज बांधव दुखावले आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुसद, कारंजा, दारव्हा हे तीन विधानसभा मतदारसंघ बंजारा बहूल आहेत. त्यामुळेच गवळी समर्थकांमध्ये काहीशी हुरहूर आत्तापासूनच पहायला मिळते आहे.