लोकसभा १९७७ ची निवडणूक; वसंतराव नाईक यांच्या ‘त्या’ भाषणाने फिरला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:24 PM2019-03-29T13:24:31+5:302019-03-29T13:24:57+5:30

आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन दिग्गजांमध्ये चुरस होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या एका भाषणाने ‘त्या’ निवडणुकीचा निकाल फिरला होता.

Election of Lok Sabha 1977; Vasantrao Naik's 'those' speech change the result | लोकसभा १९७७ ची निवडणूक; वसंतराव नाईक यांच्या ‘त्या’ भाषणाने फिरला निकाल

लोकसभा १९७७ ची निवडणूक; वसंतराव नाईक यांच्या ‘त्या’ भाषणाने फिरला निकाल

Next
ठळक मुद्दे अर्ध्या तासात होत्याचे झाले नव्हते

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन दिग्गजांमध्ये चुरस होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या एका भाषणाने ‘त्या’ निवडणुकीचा निकाल फिरला होता.
तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्यानंतर देशाचे चित्रच पालटले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण, राजनारायण, चरणसिंग, मोरारजी देसाई, जॉर्ज फर्नांडीस आदी नेत्यांनी त्यावेळी आणीबाणीविरुद्ध प्रचंड रान उठविले. परिणामी अनेकांना कारागृहात जावे लागले. विरोधकांनी प्रचंड राळ उठविल्याने काँग़्रेसविरूद्ध देशभर वातावरण तापले होते. दोन वर्षानंतर त्याच स्थितीत १९७७ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली होती.
काँग्रेसविरोधी वातावरणामुळे त्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये धाकधूक होती. त्यावेळी यवतमाळ लोकसभा मतदार संघात काँग्रेसने राळेगाव तालुक्यातील श्रीधरराव जवादे यांना उमेदवारी दिली. विरोधकांनीही त्यांच्याविरूद्ध राळेगाव तालुक्यातीलच नानाभाऊ एंबडवार यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले. जवादे यांना ‘गाय-वासरू’, तर एंबडवार यांना ‘सायकल’ चिन्ह मिळाले होते. दोन्ही उमेदवार एकाच तालुक्यातील असल्याने त्यांना एकमेकांची ‘उणी-दुणी’ चांगलीच ठाऊक होती. त्यामुळे प्रचारात रंगत आली होती. आणीबाणीमुळे विरोधी उमेदवार नानाभाऊ एंबडवार यांची चांगलीच हवा झाली होती. ते विजयाकडे कूच करीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
विरोधकांच्या आरोपांमुळे काँग्रेस उमेदवार अडचणीत आले होते. अशावेळी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जवादे यांच्या समर्थनार्थ यवतमाळच्या आझाद मैदानात सभा लावण्यात आली. ‘त्या’ सभेत नाईक यांनी ‘माणूसकीची प्रयोगशाळा’ या विषयावर भाषण देताना चांगला पक्ष व चांगला उमेदवार कसा निवडावा, याबाबत मार्गदर्शन केले. मतदारांनी उमेदवाराचे बॅकग्राऊंड तपासावे. उमेदवाराची जनतेप्रती असलेली तळमळ लक्षात घ्यावी.
पक्ष आणि उमेदवार जनतेचे हितकर्ते असावे, असे स्पष्ट केले. त्यांच्या या एका भाषणाने निवडणुकीचा नूरच पालटला अन् पराभवाच्या छायेत असलेले जवादे अखेर १२ हजार १९७ मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले होते. नाईक यांच्या एका भाषणाने निकाल फिरला होता. मात्र विरोधी उमेदवाराचे ‘होत्याचे नव्हते’ झाले होते.
या निवडणुकीनंतर देशात काँगे्रसचा पराभव होऊन केंद्रात जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले होते. मात्र अवघ्या अडीच वर्षांत हे सरकार कोसळले अन् जवादे यांची खासदारकी गेली. विशेष म्हणजे १९७७ च्या निवडणुकीत खुद्द इंदिरा गांधी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

विजयानंतर रॅली नाही
यवतमाळ मतदार संघात त्यावेळी श्रीधरराव जवादे यांना एक लाख ९२ हजार २२८ मते मिळाली होती. विरोधी उमेदवार नानाभाऊ एंबडवार यांना एक लाख ८० हजार ३१ मते मिळाली होती. १२ हजार १९७ मतांनी जवादे तरले होते. विजयानंतर काँग्रेसने विजयी मिरवणूक काढण्याची तयारी केली होती. मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी काँग्रेस नेत्यांना तुम्ही जरी जिंकले असलात, तरी इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्याची माहिती दिली. यामुळे काँग्रेसने विजयी मिरवणूक रद्द केली. दरम्यान, श्रीधरराव जवादे हे काँग्रेसमधील तत्कालीन बडे प्रस्थ शंकरराव चव्हाण यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातं. चव्हाण यांनीच जवादे यांना उमेदवारी मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठविली होती. दुसरीकडे नानाभाऊ एंबडवार यांच्याबद्दल दिवंगत वसंतराव नाईक यांना ‘आपुलकी’ होती. तथापि पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना जवादे यांच्या समर्थनार्थ सभा घ्यावी लागली होती. मतदारांनी त्यांचे भाषण ऐकून जवादे यांना निसटत्या फरकाने विजयी केले. एकूण नाईक यांच्या ‘त्या’ भाषणानेच ही निवडणूक गाजली अन् त्यांचा उमेदवारही निवडून आल्याची आठवण या निवडणुकीचे साक्षीदार असलेल्या एका ज्येष्ठ माजी लोकप्रतिनिधीने ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Election of Lok Sabha 1977; Vasantrao Naik's 'those' speech change the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.