पापलवाडीत शेतकऱ्याने फुलविली केशर शेती
By Admin | Published: March 13, 2017 12:57 AM2017-03-13T00:57:56+5:302017-03-13T00:57:56+5:30
केशर पीक म्हणजे काश्मीर असे समीकरण झाले आहे. केशराचा दरवळ केवळ काश्मीर, राजस्थान आणि गुजरातमध्येच येवू शकतो,
राज्यातील पहिला प्रयोग : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आशादायी चित्र, केशर शेती पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
संजय भगत ल्ल महागाव
केशर पीक म्हणजे काश्मीर असे समीकरण झाले आहे. केशराचा दरवळ केवळ काश्मीर, राजस्थान आणि गुजरातमध्येच येवू शकतो, अशी विदर्भातील शेतकऱ्यांची धारणा. परंतु या धारणेला खोटे ठरवत महागाव तालुक्यातील पापलवाडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात केशरची लागवड केली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील हा पहिला प्रयोग असावा.
महागाव तालुका हा शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यातीलच पापलवाडी येथील आशीष भीमराव हेलगंड यांनी मात्र केशर शेतीतून प्रगतीचा नवा मार्ग शोधत आत्महत्येच्या वाटेवर असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवी पायपाट तयार केली आहे. पापलवाडी हे हजार लोकसंख्येचे गाव. मुडाणा ते गौळ रस्त्यावर आडवळणाला आहे. परंतु आता हे गाव केशर शेतीसाठी ओळखले जावू लागले आहे. प्रयोगशील शेतकरी आशीष हेलगंड यांना गुजरातमधील त्यांच्या नातेवाईकाकडून केशर शेतीची प्रेरणा मिळाली. अन्य राज्यातील केशर उत्पादनाचा अनुभव घेवून त्यांनी आपल्या शेतीत केशर पिकविण्याचे धाडस केले.
सहा गुंठ्यात केशराची लागवड केली. त्यासाठी लागणारे बियाणेही गुजरातमधील आपल्या नातेवाईकांकडून आणले. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या या लागवडीला गव्हासारखे पाणी दिले. फेब्रुवारी महिन्यापासून केशराला फुले येण्यास सुरुवात झाली. आता या शेतातील शेतात केशरी रंगांची उधळण सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत फुले तोडून वाळू घालावी लागणार आहे. सहा गुंठ्यात साधारणत: पाच ते सहा किलो केशरचे उत्पादन अपेक्षित आहे.
सहा गुंठ्यात तीन लाखांचे उत्पन्न
सहा गुंठ्यात पिकलेले केशर जवळपास तीन लाख रुपयांचे उत्पन्न देणार असल्याचा दावा हेलगंड यांनी केला. करडीसारखे दिसणारे पीक पाहून कुणालाही केशर पीक असल्याची शंका येत नाही. तसेच जनावरे किंवा आणखी कोणताही त्रास नाही. काढायला सोपे असते. अमेरिकन केशर जोधपूर या नावाने असलेले हे बियाणे होय. लागवडीसाठी हजार बी आणले होते. पाच बाय दीड फुटात त्याची लागवड केली. ३० रुपयाला एक बी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.