सेतू केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:32 PM2018-07-19T23:32:13+5:302018-07-19T23:33:57+5:30
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय झाला. मात्र हे सुविधा केंद्र शेतकऱ्यांच्या लुटीचे केंद्र बनले आहे. अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारने दिले असताना तलाठी, मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैशांची लूट करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय झाला. मात्र हे सुविधा केंद्र शेतकऱ्यांच्या लुटीचे केंद्र बनले आहे. अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारने दिले असताना तलाठी, मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैशांची लूट करीत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सेतू केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी झाली. मात्र महा-ई-सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. तालुक्यातील लोणी येथील शेतकरी भाऊराव बोडखे पाटील यांनी बसस्थानकासमोरील एका सेवा केंद्रात पाच शेताचा पीक विमा भरला. मात्र त्यातील काही शेतातील पिकाचे पैसे भरूनही पीक विम्याचा लाभ त्यांना मिळाला नाही. महासेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट तर करीतच आहे, सोबत फसवणूकही करीत आहे. सेतू सुविधा केंद्र चालक शेतकऱ्यांना १००-१५० रुपयांची मागणी करीत आहे. एका शेतकऱ्याची एकापेक्षा जादा शेती असली, तरी त्याच्या प्रत्येक शेतासाठी वेगळे पैसे मागत आहे. याबाबत भाऊराव बोडखे यांनी तहसीलदारांना निवेदनातून लूट करणाऱ्या सेतू केंद्राचा परवाना रद्द करून कारवाईची मागणी केली. शहरातील अनेक ई-सेवा केंद्र चालक पीक विम्याचे दर, कमी-जास्त आकारत आहे. काही केंद्र चालक ७५० रुपये, तर ८४० रुपये घेत आहेत. पैसे घेतल्यानंतर पावतीही दिली जात नाही, असा आरोप शेतकरी भाऊराव बोडखे यांनी केला आहे.
मनसेनेही तहसीलदारांना तक्रार दिली. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर असभ्य वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. नेट प्रॉब्लेम दर्शवून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या संख्येने शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सेतू केंद्र चालकांकडून आर्थिक लूट सुरू असल्याने पीक विमा दरपत्रक सेतू केंद्रनिहाय तत्काळ लावावे, पीक विम्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेने केली. तहसीलदारांनी तत्काळ कारवाई न केल्यास मनसे कायदा हातात घेईल, असा इशारा दिला. निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय गडम, पुंडलिक शिंदे, गिरीश अनंतवार, संदीप लांडे, अश्विनी चिरडे, अजय नागगणे, रवी सूर्य, सतीश गवारे, वसंता मनवर, अक्षय इनामे आदींच्या स्वाक्षºया आहे.